♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मतदारांनो, नाव वगळले गेलेय ? काळजी करू नका; ३० नोव्हेंबर पर्यंत नोंदणीची पुन्हा संधी !

 

MH 28 News Live / बुलढाणा : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR-2026) अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार (ASDD) प्रवर्गात नोंद झालेल्या मतदारांना यादीत नाव समाविष्ट करण्याची पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यानुसार १८ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन होणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार प्रपत्रांची छाननी १० डिसेंबरपर्यंत, दावे-हरकतींचा निपटारा १५ डिसेंबरपर्यंत, तर अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल.

प्रारूप यादीत नाव तपासण्याचे आवाहन

बुलढाणा जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी https://buldhana.nic.in⁠ या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासावे. नाव नसल्यास किंवा BLO कडे गणना प्रपत्र जमा न केल्यामुळे नोंद वगळली असल्यास, आवश्यक पुरावे व वस्तुस्थितीनुसार भरलेले परिशिष्ट-ब आणि क जोडून ३० नोव्हेंबरपूर्वी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे प्रपत्र सादर करावे.

ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्जाची सुविधा

ASDD यादीतील मतदारांना सध्याच्या रहिवासाच्या ठिकाणी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकाऱ्यामार्फत प्रपत्र भरता येईल. तसेच ECINET प्रणालीवर उपलब्ध माहितीच्या आधारे प्रपत्र प्रत्यक्ष, व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा एसएमएसद्वारे मिळू शकते. EPIC क्रमांक वापरून ते ऑनलाइन डाउनलोड करण्याची सुविधाही आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo⁠ या संकेतस्थळावर ASDD यादी उपलब्ध असून, नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म क्रमांक ६ ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरता येईल. यापूर्वी फॉर्म क्रमांक ६ भरून ज्यांची नावे यादीत समाविष्ट झाली आहेत, त्यांना पुन्हा प्रपत्र भरण्याची गरज नाही.

जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी मुदतीपूर्वी आपली नोंद तपासून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. पडताळणी प्रक्रियेत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करून माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129