
चिखलीत विरोधकांना उत्तर द्यायला निघालेले सत्ताधारी पत्रकारांच्या प्रश्नांपुढे झाले निरुत्तर ! असमाधानकारक उत्तरांवर पत्रकारांची नाराजी, पत्रकार परिषदेतवर टाकला बहिष्कार
MH 28 News Live / चिखली : नगरपालिकेतील विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली सत्ताधारी भाजप – शिवसेनेची पत्रकार परिषद पत्रकारांच्या प्रश्नांमुळे चर्चेचा विषय ठरली. १८ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील गोंधळ, अवघ्या पाच ते दहा मिनिटांत २१ ठराव मंजूर केल्याची घोषणा आणि सभेच्या कामकाजातील कथित नियमबाह्यतेबाबत पत्रकारांनी विविध प्रश्न उपस्थित केले. मात्र, या प्रश्नांना अपेक्षित स्पष्टता आणि समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. काही प्रश्नांची उत्तरे देताना विषयांतर होत असल्याचे, तर काही प्रश्न अनुत्तरित राहत असल्याचे दिसून आले. पत्रकार परिषद लवकर संपविण्याची घोषणा झाल्यानंतर उपस्थित पत्रकारांनी नाराजी व्यक्त करत बहिष्कार टाकला आणि सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आयोजित केलेली ही पत्रकार परिषद अखेर सत्ताधाऱ्यांसाठीच प्रश्नोत्तरांचे आव्हान ठरली.
सागर पुरोहितांकडून प्रश्नांना अपेक्षित उत्तरे मिळाली नाहीत
भाजप शहराध्यक्ष सागर पुरोहित यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. मात्र, पत्रकारांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक मुद्द्यांवर त्यांच्याकडून अपेक्षित स्पष्टीकरण मिळू शकले नाही. काही प्रश्नांना थेट उत्तरे मिळण्याऐवजी विषयांतर होत असल्याची आणि उत्तरे विसंगत असल्याची भावना पत्रकारांनी व्यक्त केली. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा बांधकाम सभापती सुहास शेटे, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देवडे, शिवसेना नेते कपिल खेडेकर, आरोग्य सभापती विष्णू जोगदंडे, पाणीपुरवठा सभापती दत्ता सुसर यांच्यासह नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. विरोधकांनी केलेल्या आरोपांबाबत सत्ताधाऱ्यांची भूमिका स्पष्ट होणे अपेक्षित असताना सर्व प्रश्नांवर ठोस माहिती मिळाली नसल्याने पत्रकारांमध्ये नाराजी व्यक्त झाली. पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तरांसाठी पुरेसा वेळ आणि स्पष्ट संवाद अपेक्षित होता, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
तोकडे खुलासे; प्रेस नोटचे वितरण नाही
पत्रकारांनी सर्वसाधारण सभेतील २१ ठरावांबरोबरच शहराच्या विकासाशी आणि नागरिकांच्या प्रश्नांशी संबंधित विविध मुद्दे उपस्थित केले. सत्ताधारी नगरसेवकांपैकी एक नगरसेवक सभेला गैरहजर असताना ठराव मंजूर कसे झाले? बॉम्बे मार्केटचे बीएटी तत्त्वावर बांधकाम सुरू करण्यासंदर्भातील ठराव कोणत्या आधारावर घेण्यात आला? रोहिदास नगर, भीम नगर आदी भागांतील गरीब नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी भूखंडांचे पट्टे देण्याबाबत सत्ताधाऱ्यांची भूमिका काय आहे ? श्रीराम पतसंस्थेपासून बैलजोडीपर्यंतचा सिमेंट रस्ता कधी बांधला जाणार? नगर परिषदेची सर्वसाधारण सभा दर महिन्याला नियमितपणे का बोलावली जात नाही ? असे अनेक प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केले. मात्र, या प्रश्नांवर आयोजकांकडून समाधानकारक खुलासा होऊ शकला नाही. विशेष म्हणजे, पत्रकार परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रेस नोटचे वितरणही पत्रकारांना करण्यात आले नाही. त्यामुळे पत्रकार परिषदेत मांडण्यात येणारी सत्ताधाऱ्यांची अधिकृत भूमिका आणि विरोधकांच्या आरोपांवरील स्पष्टीकरण याबाबतही स्पष्टता निर्माण झाली नाही.
नगराध्यक्षांच्या अनुपस्थितीमुळे महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे राहिली अपुरी
चिखली नगर परिषदेत भाजप-शिवसेनेची सत्ता असून भाजपचे पंडितराव देशमुख नगराध्यक्ष आहेत. सर्वसाधारण सभेतील कामकाजावरून विरोधकांनी गंभीर आरोप केलेले असताना त्यावर खुलासा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला नगराध्यक्षांनी स्वतः उपस्थित राहून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देणे अपेक्षित होते. मात्र, नगराध्यक्ष पंडितराव देशमुख या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते. शहराच्या कारभाराशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सत्ताधाऱ्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्षांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. त्यांच्या अनुपस्थितीत उपस्थित पदाधिकाऱ्यांकडूनही सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकली नाहीत. सर्वसाधारण सभेतील निर्णयांची जबाबदारी नेमकी कोणाची? जनतेच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चा का झाली नाही? यांसारख्या मुद्द्यांवर नगराध्यक्षांकडून थेट स्पष्टीकरण मिळाले असते, अशी अपेक्षा पत्रकारांनी व्यक्त केली.
प्रश्नोत्तरांना पूर्णविराम; पत्रकारांचा बहिष्कार !
श्रीराम नागरी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत प्रश्नांची सरबत्ती सुरू असतानाच सागर पुरोहित यांनी पत्रकार परिषद संपल्याचे जाहीर केले. यावर पत्रकारांनी आक्षेप घेत, प्रश्नांची उत्तरे पूर्णपणे मिळाली नसताना पत्रकार परिषद संपविण्याची घाई का, असा सवाल उपस्थित केला. आम्हाला आणखी प्रश्न विचारायचे आहेत, असे स्पष्ट करत पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली आणि पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकून सभागृहाबाहेर पडले. विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना आपली बाजू मांडण्याची संधी असतानाही अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. नगरपालिकेची सर्वसाधारण सभा ही जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याने सभेतील निर्णय, ठराव आणि कामकाजाबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती देणे आवश्यक आहे. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्याबरोबरच पत्रकारांनी उपस्थित केलेल्या शहरातील मूलभूत प्रश्नांवरही सत्ताधाऱ्यांकडून सविस्तर स्पष्टीकरण मिळणे अपेक्षित होते. पत्रकार परिषद संपली, पत्रकार बाहेर पडले; मात्र चिखलीकरांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे अद्यापही प्रतीक्षेतच राहिली.



