
चिखली नजिक अपघात; पेट्रोल भरून गावाकडे परतणाऱ्या दुचाकीस्वार युवकावर काळाचा घाला; भालगाववर शोककळा
MH 28 News Live, चिखली :
अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार युवकाचा मृत्यू झाला. ही घटना चिखली- भालगाव रोडवरील शिवाजी भगत यांच्या शेताजवळ काल, २५ मार्चला सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. तालुक्यातील भालगाव येथील सुनिल शिवाजी इंगळे (३० ) याचा या अपघातात मृत्यू झाला.
या प्रकरणी मृतक युवकाचे काका राजेंद्र इंगळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काल सायंकाळी पेट्रोल भरण्यासाठी सुनिल त्याच्या हिरोहोंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकलने (MH 28 AA 8641) चिखलीच्या मेहकर फाट्यावर गेला होता. पेट्रोल भरून परतत असताना साडेसातच्या सुमारास शिवाजी त्र्यंबक भगत यांच्या शेताजवळ भालगावकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला उडवले.
यात सुनिलच्या डोक्याला व उजव्या पायाला मार लागून तो गंभीर जखमी झाला. उत्तम सखाराम इंगळे (रा. भालगाव) हे चिखलीकडे येत असताना त्यांना सुनील जखमी होऊन पडलेला दिसला. त्यांनी लगेच गावात ही माहिती दिली. त्यानंतर राजेंद्र इंगळे आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत गावातीलच चंदू सिताराम शिंदे यांच्या मालवाहू गाडीत गावातील लोकांनी त्याला उपचारासाठी चिखलीच्या जवंजाळ हॉस्पिटलमध्ये भरती केले. उपचारादरम्यान सुनीलचा मृत्यू झाला.