
एकाच रात्री चिखलीत पाच घरफोड्या… मोठी लूट करण्याचा प्रयत्न फसला मात्र अज्ञात चोरट्यांनी लांबवले देव्हाऱ्यातील पैसे
MH 28 News Live, चिखली : चिखली शहरातील जुने गाव परिसरातील गणेश नगर व दीनदयाळ नगर भागात २७ एप्रिलच्या रात्री पाच ठिकाणी घरफोड्या झाल्या. संबंधित कुटुंबातील लोक बाहेरगावी गेल्याची संधी साधून रात्रीच्या प्रसंगी घर तोडून घरात प्रवेश केलेल्या चोरट्यांचा मोठी लूट करण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. मात्र, एका ठिकाणी त्यांनी चक्क देव्हाऱ्यात ठेवलेली देवपूजेची सुमारे दोन हजार रुपयांची रक्कम लांबवली. याप्रकरणी एका फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, चिखली शहरातील जुने गाव परिसरात गणेश नगर व दीनदयाळ नगर भागामध्ये काल दि. 27 एप्रिलच्या रात्री काही अज्ञात चोरट्यांनी पाच ठिकाणी घराची कुलपे तोडून घरांमध्ये प्रवेश केला. घरफोडीच्या या प्रकारातून त्या चोरट्यांच्या हाती फारशी मोठी लूट लागली नसली तरी किरकोळ मुद्देमालावर मात्र त्यांनी हात साफ केला आहे. गणेश नगर भागातील अशोक विष्णूपंत जोशी, देवेश राजन सावजी, निळकंठ पांडुरंग पांडुरंगा कथने व दीनदयाळ नगर परिसरातील सुधीर मार्तंडराव जोशी आणि वसंतराव सानप यांच्या घरी काल रात्री घरफोडी होऊन घरातील किरकोळ वस्तू अज्ञात चोरट्यांनी लुटून नेल्या. या संबंधी श्रीपाद मार्तंडराव जोशी यांनी चिखली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. MH 28 News Live ने यापैकी वसंतराव सानप यांच्या कुटुंबाशी संपर्क साधला असतात त्यांच्या घरातील देव्हाऱ्यात ठेवलेली लक्ष्मीपूजनाची रक्कम सुमारे दोन हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची माहिती निलेश वसंतराव सानप यांनी दिली.
ज्या ठिकाणी असे प्रकार घडले त्यापैकी बहुतांश कुटुंबातील सर्व जण काही कारणाने बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरात कुणीही नव्हते व या घरांना कुलूपे लावलेली होती. कदाचित चोरट्यांना ही गोष्ट माहीत असावी, त्यामुळे नेमके जी घरे कुलूपबंद आहेत त्याच घरात रात्रीच्या अंधारात घुसण्याचा प्रयत्न त्यांनी केला. रात्री दोन ते पाच वाजेदरम्यान या बंद असलेल्या घरांची कुलूपे तोडून अज्ञात चोरटे आत शिरले. पहाटे पहाटे हा प्रकार शेजार्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मोबाईलवर संपर्क करून संबंधित कुटुंबाला याबाबत कळवले. घरफोडी झालेल्या घरातील बाहेरगावी गेलेले सदस्य सध्या परतीच्या वाटेवर असल्याने कोणाच्या घरातून नेमके काय काय चोरीला गेले त्याबद्दल तपशीलवार माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही.