
म.ज्यो.फुले विद्यालयातर्फे पत्रकारांचा सत्कार
MH 28 News Live, मेहकर : महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव माळी यांच्या वतीने सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारांचा भव्य असा सत्कार करण्यात आला. पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ. पत्रकाराची लेखणी चालली म्हणजे शून्य व्यक्ती महत्त्व असणारी व्यक्ती ही उच्च पदावर पोहोचू शकते तर उच्चपदस्थ व्यक्ती ही नामशेष होऊ शकते. अशी ताकद या पत्रकारांच्या लेखणीत आहे. अशा या पत्रकारांचा महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.
सर्वप्रथम दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर, माता सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, व महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार कैलास राऊत, हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव तथा देऊळगाव माळी चे प्रथम नागरिक किशोर गाभणे हे होते. यावेळी पत्रकार संजय खरात, गजेंद्र गवई, रवींद्र सुरूशे, कैलास राऊत, राजेश मगर, शिवशंकर मगर, आदी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकारांच्या लेखणीत किती ताकद असते हे किशोर गाभणे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच पत्रकारिता म्हणजे काय? व पत्रकारिता करत असताना कोणती दक्षता घ्यावी लागते. तसेच पत्रकारासमोर असलेले आवाहन. याची माहिती गजेंद्र गवई व कैलास राऊत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. यावेळी पर्यवेक्षक एम.व्ही.गाभणे, सरपंच किशोर गाभणे यांनी उपस्थित पत्रकारांचा सत्कार केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कलोरे यांनी केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.



