♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सरपंच पतीने स्मशानभूमीवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी मुंदेफळच्या गावकऱ्यांचे पडत्या पावसात आमरण उपोषण सुरू; आज तिसरा दिवस

MH 28 News Live / मेहकर : मुंदेफळ येथे स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामस्थांनी गावातील अनंत मदन चांदणे यांच्या शेतामध्ये २४ मे रोजी उपोषणाला सुरुवात केली. आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस अवकाळी पाऊस पडत असून देखील गावकरी आपल्या उपोषणा पासून मागे हटले नाहीत हे विशेष.

गावातील स्मशानभूमी रुंदेफळ शिवार गट क्रमांक २० मधील ०.४० आर क्षेत्रावर आहे, जी कायदेशीरपणे स्मशानभूमीसाठी आरक्षित असल्याचे ७/१२, ८ अ आणि इतर महसूल कागदपत्रांवर नमूद आहे. तरीही, गावातील सरपंच पती व त्यांच्या सहकाऱ्यांनी या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या संदर्भात अनेक वेळा प्रशासन आणि शासन दरबारी पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांच्या सब्राचा बांध तुटला असून, त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. अतिक्रमणामुळे मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात अडथळे निर्माण होत आहेत, ही गावकऱ्यांची प्रमुख तक्रार आहे.

ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, स्मशानभूमीच्या मोजणीस तातडीने सुरुवात करून अतिक्रमण हटवावे व जागा ग्रामस्थांच्या ताब्यात देण्यात यावी. यासंदर्भात वारंवार निवेदने देऊनही तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

उपोषणकर्त्यांमध्ये अनंत मदन चांदणे, रमेश दिगंबर चांदणे, अमोल रमेश चांदणे, देवानंद नारायण चांदणे, सुनील भीमराव चांदणे, सागर समाधान शिंदे यांचा समावेश आहे. त्यांच्या आरोग्याला काहीही झाले, तर त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असा स्पष्ट इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.

जोपर्यंत स्मशानभूमीची अधिकृत जागा उपलब्ध करून दिली जात नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी गावकऱ्यांची ठाम मागणी आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129