
ऑनलाइन स्टोअरचे आमिष दाखवून चिखलीच्या प्राध्यापकाची ; १.४० कोटींने फसवणूक, १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
MH 28 News Live / चिखली : ऑनलाइन स्टोअर सुरू करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ५० वर्षीय व्यक्तीची तब्बल १ कोटी ४० लाख २६ हजार ८३८ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर विटा पोलिसांनी देश – विदेशातील १४ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणामुळे सायबर फसवणुकीच्या वाढत्या जाळ्याबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

चिखली येथील मूळ रहिवासी असलेले निरंजन शिशिर महाजन ( ५० ) हे सातारा जिल्ह्यातील विटा येथे फार्मसी कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. तेथील येथील संभाजीनगर परिसरात ते राहतात. त्यांना एका वेबसाइटद्वारे ऑनलाइन स्टोअर सुरू करण्याची आकर्षक ऑफर देण्यात आली. या व्यवसायातून मोठा आर्थिक लाभ मिळेल, असे सांगून संशयितांनी त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर २६ सप्टेंबर २०२५ ते ४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विविध कारणे सांगत यूपीआय, आरटीजीएस आणि आयएमपीएसद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वेळोवेळी पैसे जमा करण्यास भाग पाडले. महाजन यांनी एकूण १.४० कोटींहून अधिक रक्कम भरल्यानंतरही ऑनलाइन स्टोअर सुरू करण्यात आले नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी न्यायालयात धाव घेतली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत विटा येथील फौजदारी न्यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १७५ (३) अन्वये गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात ‘स्टोअर – एनव्हीवायआय’ (कॅलिफोर्निया, अमेरिका), कार्तिक राज गौतम, सिद्धार्थ पढीयार, यश स्टुडिओ, वसीम अहमद, अमनप्रीत सिंग, बलजिंदर सिंग, हिमांशु, रजनी, कृष्णा एक्सपर्टस, विश्वजीत सिंग, व्ही. ए. ट्रेडर, निखिल राणा, कश्मीर सिंग आणि साहिलप्रीत सिंग अशा एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बहुचर्चित सायबर फसवणूक प्रकरणाचा पुढील तपास विटा पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनंजय फडतरे करत आहेत.



