♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखलीत भटक्या कुत्र्यांची दहशत कायम… लाखो रुपयांची नसबंदी कागदावरच ? मोकाट कुत्र्यांची चावाचाव थांबेना ! आणखी एका तरुणाचा तोडला लचका ​

MH 28 News Live // ​चिखली : नगरपालिकेच्या श्वान नसबंदी अभियानावर लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्याचा दावा केला जात असला, तरी चिखलीकरांच्या नशिबी मात्र आजही कुत्र्यांचे चावे, प्रचंड भीती आणि जीवघेणी पळापळच आल्याचे चित्र आहे. ‘हॅलो बुलढाणा’ने श्वानदंशाची गंभीर आकडेवारी आणि नसबंदीच्या प्रक्रियेतील संशयास्पद कारभार समोर आणल्यानंतरही परिस्थिती जैसे थेच आहे. नुकतीच आनंदनगर येथील रहिवासी अयात सादिक हे आपल्या घरासमोर उभे असताना त्यांना भटक्या कुत्र्याने चावा घेतला. पूर्वसूचना देऊनही नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कसलीही खबरदारी घेतली नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरवेळी घटनेनंतर नागरिकांनी उपचारासाठी धावपळ करायची आणि पुन्हा त्याच भीतीपोटी रस्त्यावरून चालायचे, मग नगरपालिकेच्या जबाबदारीचे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

​जुन्या मेहकर रस्त्यावर दुचाकीस्वारांची जीवघेणी धडपड
​खंडागळे हॉस्पिटलसमोरील जुन्या मेहकर रस्त्यावर तर परिस्थिती अधिकच बिकट आणि जीवघेणी बनली आहे. रात्रीच्या वेळी कामावरून परतणारे दुचाकीस्वार आणि रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या अंगावर कुत्र्यांचे घोळके थेट धावून जातात. कुत्र्यांच्या हल्ल्यापासून जीव वाचवण्यासाठी घाबरलेले चालक वाहनाचा वेग वाढवतात, ज्यामुळे गतिरोधकावरून गाड्या उसळून गंभीर अपघाताची भीती निर्माण होते. एखादी दुचाकी घसरून मागे बसलेला रुग्ण फेकला गेला किंवा प्राणघातक अपघात झाला, तर याला जबाबदार कोण? प्रशासनाला उपाययोजना करण्यासाठी एखाद्या मोठ्या दुर्घटनेचे निमंत्रण हवे आहे का, असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत.

​४६ महिन्यांत तब्बल ११,६०० श्वानदंश; आकडेवारीने जिल्हा हादरला

​’MH 28 News Live’ च्या वृत्तानुसार चिखली शहरात गेल्या ४६ महिन्यांत ११,६०० हून अधिक श्वानदंशाच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत, तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात हा आकडा सव्वा लाखाच्या पार गेला आहे. या सर्व प्रकारावर सामाजिक कार्यकर्ते सचिन राठी हे आरोग्य विभागाकडून माहिती व कागदपत्रांचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. केवळ नसबंदीने चावे थांबत नसले, तरी पालिकेने नसबंदी केलेल्या कुत्र्यांची संख्या, लसीकरणाची व्याप्ती आणि यावर झालेल्या खर्चाचा हिशेब जनतेसमोर मांडणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ फाइलमधील कागदी आकडे नागरिकांचे संरक्षण करू शकत नाहीत.

​ ठोस कृती करण्याची गरज

​शहरातील बालके, कामगार आणि उपचारासाठी जाणारे रुग्ण यांना भयमुक्त रस्त्यांची गरज आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने आनंदनगर तसेच जुन्या मेहकर रस्त्याची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून श्वान नियंत्रण आणि लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबवावी. तसेच नागरिकांच्या तक्रारी निवारणासाठी स्पष्ट यंत्रणा उभी करून नसबंदीच्या खर्चाची कागदपत्रे सार्वजनिक करावीत, जेणेकरून या कामातील संशयाचे वातावरण दूर होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129