
ब्रेकींग न्यूज – ४ हजाराची लाच घेताना खामगावात भूमापन अधिकारी रंगेहात पकडला
MH 28 News Live, खामगाव : भ्रष्टाचाराचा अड्डा म्हणून प्रसिद्ध असलेले येथील भूमी अभिलेख कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ४ हजाराची लाच घेताना या कार्यालयातील चव्हाण नामक कर्मचाऱ्यास बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी गजाआड केले.
खामगाव भूमी अभिलेख कार्यालय भ्रष्ट अधिकाऱ्यांचा अड्डा म्हणून नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. जागेची फेरफार, नमुना नकाशा, शासकीय खरेदी, शासकीय मोजणी यासह विविध महत्त्वाची कामे या कार्यालयामध्ये होत असतात. मात्र कोणतेही काम करायचे म्हटले की या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांकडून नेहमीच टेबलाखालून हात लांबविण्याचे प्रकार होतात. सामान्य नागरिकांना कोणतेही दस्तावेज बाबत फेरफार अथवा नमुना आठ काढायचे असल्यास कर्मचाऱ्यांकडून चिरीमिरी घेतल्याशिवाय कोणतेही कार्य वेळेच्या आत केले जात नसल्याची नेहमीच ओरड असायची. याबाबत आज सत्य समोर आले असून कार्यालयातील भूमापन अधिकारी के. आर. चव्हाण यांनी एका इसमाकडून मोजणीकरिता चार हजार रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले.
शासकीय काम आणि लाचेची मागणी कशासठी ? असा प्रश्न संबंधित इसमाला पडल्याने त्याने याबाबत थेट बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. सदर तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अगोदर छाननी केली व ११ मार्च रोजी सापळा रचला. भूमापन अधिकारी के. आर. चव्हाण यांनी संबंधित इसमाकडून लाचेची मागणी केलेले ४ हजार रुपये ११ मार्च रोजी दुपारी कार्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकान्यांसमक्ष स्वीकारल्याने पथकाने त्यांना लगेच रंगेहात पकडले.