
रखवालदाराला कोंडून घेत चिखलीत अज्ञात चोरट्यांनी केले सुमारे १ लाख ६५ हजाराचे ३३ क्विंटल सोयाबीन लंपास
MH 28 News Live : शेतकऱ्याने आपल्या शेतात बांधलेल्या टीन शेडमध्ये ५१ कट्ट्यांमध्ये सुमारे 33 क्विंटल सोयाबीन सुरक्षित ठेवले, या सोयाबीनवर राखण करण्यासाठी एक राखणदार देखील शेतकऱ्याने नेमला. मात्र, मध्यरात्री या राखणदारालाच कोंडून घेत अज्ञात चोरट्यांनी ३३ क्विंटल सोयाबीन लंपास केल्याची घटना चिखली लगत असलेल्या सवना शिवारातील लक्ष्मीनारायण गुलाबचंद खंडेलवाल यांच्या शेतात घडली. दि. २२ डिसेंबर च्या रात्री झालेल्या या चोरीचा फिर्याद लक्ष्मीनारायण खंडेलवाल यांचे चिरंजीव मोहन लक्ष्मीनारायण खंडेलवाल यांनी चिखली पोलिसांकडे दिली असून चिखली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
सविस्तर घटना अशी घडली की, येथील श्री रेणुका देवी मंदिराजवळ राहणारे लक्ष्मीनारायण गुलाबचंद खंडेलवाल यांची चिखली लगत असलेल्या सवना शिवारात शेत सर्वे क्रमांक ५१ मध्ये १३ एकर शेत जमीन आहे. खंडेलवाल यांनी आपल्या शेतामध्ये एक टीन शेड बांधले असून तेथे त्यांनी शेतात उत्पादन केलेल्या सोयाबीनची साठवण केली होती. सुमारे ३३ क्विंटल सोयाबीन ५१ कट्ट्यांमध्ये खंडेलवाल यांनी तेथे साठवून ठेवले होते. या सोयाबीनवर राखण करण्यासाठी त्यांनी सुनील सुखलाल अचया रा. चारबंद, ता. जळगाव जामोद याची राखणदार म्हणून नेमणूक केली होती. दि. २२ डिसेंबर रोजी शेतात निंदन सुरू असताना मोहन खंडेलवाल हे तेथेच होते. सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेदरम्यान मोहन खंडेलवाल हे शेतातून परत आले तेव्हा सदर टीनशेड व्यवस्थित लावलेले होते, तसेच रात्री १० वाजता रखवालदार सुनील अचया याने देखील हे टिन शेड व्यवस्थित बंद असल्याची खात्री करून घेतली होती.
मात्र आज दि. २३ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता मोहन खंडेलवाल यांना मोबाईल फोनवरून कॉल करून रखवालदार सुनील अचया याने आपल्याला खोलीमध्ये बंद करून कोणीतरी बाहेरून दरवाजा बंद केल्याची माहिती दिली. त्या नंतर मोहन खंडेलवाल यांनी शेतापासून जवळच असलेल्या आशीर्वाद मंगल कार्यालयातील नितीन अंभोरे यांना फोन कॉल करून दरवाजा उघडण्याची विनंती केली. अंभोरे यांनी शेतात जाऊन दरवाजा उघडला, त्यानंतर सुनील अचया याने मोहन खंडेलवाल यांना कॉल करून टीनशेडची काही पत्रे कोणीतरी उचकटून बाजूला ठेवल्याची माहिती दिली. मोहन खंडेलवाल हे शेतात येऊन पोहोचले तेव्हा त्यांना या चोरीचा उलगडा झाला. खंडेलवाल यांच्या शेतातील टीन शेडमधील अंदाजे १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे ५१ कट्ट्यांमध्ये साठवून ठेवलेले सुमारे ३३ क्विंटल सोयाबीन अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात झाले. झालेल्या घटनेबद्दल मोहन खंडेलवाल यांनी शिकली पोलिसांकडे आज तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास कार्य सुरू केले आहे.