
धाड येथे ग्रामसेवकासह सदस्यांनी स्वत: ला ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले; ३.५ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
MH 28 News Live / धाड : ग्रामपंचायत निधीच्या खर्चाचा हिशेब वारंवार मागवूनही माहिती दिली जात नसल्याचा आरोप करत धाड येथील ग्रामपंचायतीतील सदस्यांनी गुरुवारी थेट ग्रामसेवकासह स्वतःलाही कार्यालयात कोंडून घेत आंदोलन छेडले. तब्बल ३.५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप या आंदोलनामागे असून, संध्याकाळी उशिरापर्यंत संतप्त ग्रामपंचायत सदस्यांचा ठिय्या सुरूच होता.
माजी सरपंच व विद्यमान सदस्य रिजवान सौदागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यांच्यासह इतर सदस्यांनी ग्रामसेवकाच्या कार्यशैलीवर गंभीर आक्षेप घेतले असून, १५व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीत पारदर्शकता नसल्याचा आरोप केला आहे.
या निधीतून डस्टबिन खरेदी, धूरफवारणी, घनकचरा व्यवस्थापन व आरोग्य शिबिर यांसारख्या कामांसाठी खर्च दाखवण्यात आला आहे. मात्र, या कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी व खर्चाचे दस्तऐवज सदस्यांना न दाखवता कामे मंजूर झाल्याचा आरोप करत ग्रामसेवकावर पक्षपातीपणा व माहिती लपवण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
“सार्वजनिक निधीचा हिशेब हा नागरिकांचा हक्क असून, तो वेळेत न देणं हे भ्रष्ट कारभाराचं स्पष्ट लक्षण आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली. ग्रामसेवकाची बाजू ऐकण्यासाठी संबंधित अधिकारी किंवा पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी देखील करण्यात आली.
दरम्यान, या आंदोलनामुळे परिसरात खळबळ उडाली असून, शासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा सदस्यांनी दिला आहे.