♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बावनकुळे जिल्ह्यात पोहोचण्यापूर्वीच शेतकऱ्याने आवळला मृत्यूचा फास; चिठ्ठीत उघड झाली अस्मानी अन् सुलतानी संकटाची भीषणता

 

MH 28 News Live / ​संग्रामपूर : संपूर्ण राज्यासह विशेषतः विदर्भात दुष्काळाचे संकट दिवसागणिक अधिक गहिरे अन् विदारक होत चालले आहे. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाच्या नशिबी पुन्हा एकदा निराशाच आल्याने, कोरड्या पडलेल्या पाझर तलावांसोबतच शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रूही आता सुकले आहेत. अवर्षणाचा हा घाव, मानगुटीवर बसलेले सावकारी अन् बँकेचे कर्ज आणि सततच्या नापिकीला कंटाळून अन्नदात्याचे जीवन संपण्याचे दुर्दैवी सत्र थांबायला तयार नाही. याच विदारक परिस्थितीत आज संग्रामपूर तालुक्यातील चोंडी टाकळेश्वर येथे एका तरुण शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली

​महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विदर्भातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. संग्रामपूर तालुक्यातील चोंडी टाकळेश्वर येथे शेताच्या बांधावर जाऊन ते थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार होते. सरकार आपल्या दारी येईल आणि काहीतरी दिलासा मिळेल, या आशेने दुष्काळाच्या खाईत होरपळणारा शेतकरी वाट पाहत होता. मात्र, मंत्री महोदय गावात पोहोचण्यापूर्वीच अतोनात आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शंकर भारसाकळे या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन मृत्यूला जवळ केले.

​आत्महत्या करण्यापूर्वी शंकर भारसाकळे यांनी लिहिलेली भावुक आणि तितकीच जळजळीत चिठ्ठी हाती आली असून, त्यातील शब्दाशब्दांतून दुष्काळाची भीषणता आणि सरकारी व्यवस्थेविषयीचा तीव्र संताप उघडा पडला आहे.

​राज्य सरकारने केवळ कागदावर दुष्काळ जाहीर केला खरा; परंतु प्रत्यक्ष मदतीचा एक रुपयाही अजून शेतकऱ्याच्या हाती पडलेला नाही. ‘शासकीय घोषणा आणि मदत मिळण्याआधीच शेतकऱ्यांवर मरण कवटाळण्याची वेळ येत आहे,’ हे भीषण वास्तव आजच्या या घटनेने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणले आहे. “शासनाने आता तरी कागदोपत्री घोडे नाचवणे थांबवावे आणि लालफितीच्या कारभारात अडकलेली मदत थेट शेतकऱ्यांच्या हाती सुपूर्द करावी,” अशी आक्रंदमयी मागणी आता संपूर्ण जिल्ह्यातून होत आहे. एका तरुण शेतकऱ्याच्या बलिदानाने चोंडी टाकळेश्वरसह संपूर्ण बुलढाणा जिल्हा सुन्न झाला असून परिसरावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129