
तहानलेल्या’ घाटबोरीवर दुष्काळाचे सावट… पाझर तलावात ३० टक्केच साठा, शेतीच्या उपशावर तात्काळ बंदीची मागणी
MH 28 News Live / डोणगाव : पावसाने यंदा दिलेल्या हुलकावणीमुळे परिसरात दुष्काळाची भीषण छाया पसरली असून, तीव्र पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. गट ग्रामपंचायत घाटबोरी क्षेत्रातील पाझर तलावामध्ये सध्या अवघा ३० ते ४० टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, भविष्यात पिण्याच्या पाण्याचा यक्षप्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तलावावरून शेतीसाठी सुरू असलेला बेसुमार पाणी उपसा रोखण्यासाठी विजेचा पुरवठा तात्काळ खंडित करण्याची आक्रमक मागणी घाटबोरी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.
घाटबोरी, टेंभूर्खेडा आणि नागेशवाडी या तिन्ही गावांची पिण्याच्या पाण्याची संपूर्ण मदार याच पाझर तलावावर अवलंबून आहे. मात्र, सध्या या तलावावरून शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा बेसुमार उपसा सुरू असल्याने तलावातील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे. हा उपसा असाच सुरू राहिल्यास आगामी काळात नागरिकांना अन् अन्न-पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची व तीव्र टंचाईला सामोरे जाण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रथम प्राधान्याने सोडवण्यासाठी आणि तलावातील उरलेला पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी शेतीसाठीचा वीज पुरवठा तात्काळ खंडित करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन घाटबोरीचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने मेहकरच्या तहसीलदारांना देण्यात आले आहे.
”सध्याची भीषण दुष्काळी परिस्थिती पाहता भविष्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्याच्या दृष्टीने आम्ही ही मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सहकार्य करावे आणि कोणीही पाण्याचा उपसा करू नये.”
— शरद वानखेडे (ग्रामपंचायत अधिकारी, घाटबोरी)



