♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पोलीस ठाण्यासमोरच रक्तरंजित थरार ! तलवारी-चाकूंच्या हल्ल्यात नगरसेवकासह दोघांचा मृत्यू; देऊळगाव राजात खळबळ

 

MH 28 News Live / देऊळगाव राजा : कव्वालीच्या कार्यक्रमात लहान मुलांच्या भांडणावरून सुरू झालेला वाद सोमवारी अक्षरशः रक्तरंजित संघर्षात बदलला. दोन गटांमधील वाद इतका विकोपाला गेला की, पोलीस ठाण्याच्या गेटसमोरच तलवारी आणि चाकूने एकमेकांवर हल्ला करण्यात आला. या थरारक घटनेत एका नगरसेवकासह दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे देऊळगाव राजा शहरात एकच खळबळ उडाली असून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

कव्वालीतील मुलांच्या भांडणाने पेटला वाद

प्राप्त माहितीनुसार, रविवारी रात्री देऊळगाव राजा येथील आठवडी बाजार परिसरात कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान काही लहान मुलांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले. या भांडणाचे पडसाद पुढे दोन नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये उमटले. दोन्ही गटांमध्ये वाद वाढत गेल्याने प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. सोमवारी याच वादातून दोन्ही गट पोलीस ठाण्याच्या गेटजवळ आमनेसामने आले.

काही क्षणांतच हाणामारी; तलवार – चाकूने हल्ला

पोलीस ठाण्याच्या अगदी समोर दोन्ही गटांमध्ये वाद सुरू असतानाच परिस्थिती अचानक चिघळली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ला चढविल्याची माहिती आहे. यावेळी तलवार आणि चाकूचा वापर करण्यात आला. या हल्ल्यात नगरसेवक शेख अनवर शेख अली उर्फ अन्नुमाया यांच्या डोक्यावर आणि मानेवर तलवारीने वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्याचप्रमाणे आरिफ खान हारून खान पठाण यांच्या पोटात चाकूने वार झाल्याने तेही गंभीर जखमी झाले.

हल्ल्यानंतर परिसरात काही काळ मोठा गोंधळ निर्माण झाला. गंभीर जखमी अवस्थेत दोघांनाही तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे नेण्यात आले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी उपचार सुरू ठेवले. अखेर उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.

राजकीय वादाला रक्तरंजित वळण; शहरात तणाव

या घटनेची माहिती शहरात पसरताच नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. राजकीय वादातून घडलेल्या या हिंसक घटनेमुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

या हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, हल्ल्यात किती जण सहभागी होते आणि तलवार-चाकू घटनास्थळी कसे आले, याचा तपास पोलीस करीत आहेत. घटनेनंतर परिसरातील परिस्थितीवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. किरकोळ वादातून सुरू झालेल्या संघर्षाने दोन जणांचा जीव घेतल्याने देऊळगाव राजा हादरले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129