
उसनवारीवरून उसळला वाद ! मलकापुरात तरुणाला खुर्चीला बांधून अमानुष मारहाण; मारहाणीचा व्हिडिओ केला व्हायरल
MH 28 News Live | मलकापूर : उसनवारीच्या वादातून एका तरुणाला खुर्चीला बांधून अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मलकापूरमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला असून, यामुळे पीडित तरुणाची समाजात मानहानी झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.

ताजनगर, पारपेठ मलकापूर येथील शेख जाकीर शेख जाबीर (वय ३५) याला हाशमी नगरमधील एका भंगार गोदामात बोलावून नेण्यात आले. तक्रारीनुसार, सैयद अफरोज सैयद हसन कुरेशी (राहणार: कुरेशी नगर) व जावेद शाह शफी शाह (राहणार: पांढरी प्लांट) या दोघांनी त्याला खुर्चीला बांधले आणि उधारीच्या पैशांबाबत विचारणा करत शिवीगाळ व मारहाण केली. या सर्व प्रकाराचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले.

पीडित तरुणाने आपली सुटका करण्यासाठी विनवणी केली असता, आरोपींनी त्याला १५ दिवसांची मुदत दिली आणि पैसे परत न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. समाजमाध्यमांवर व्हिडीओ व्हायरल झाल्याने या घटनेला अधिकच गांभीर्य प्राप्त झाले असून, संबंधित व्यक्तीची समाजात प्रतिमा मलिन झाली आहे.

मलकापूर पोलिसांनी सैयद अफरोज व जावेद शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर वर्गे या प्रकरणाचा तपास करत आहेत.



