
सुकन्या समृद्धीच्या जनजागृतीसाठी विशेष मोहिम
MH 28 News Live, बुलडाणा : डाक विभागामार्फत सुकन्या समृद्धी योजनेच्या जनजागृतीसाठी दि. १० फेब्रुवारी पर्यंत जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. यात दहा वर्षाखालील मुलींचे सुकन्या समृद्धी खाते उघडण्यात येणार आहे.
डाक विभागामार्फत यावर्षी आझादी का अमृत महोत्सवांतर्गत दिल्ली येथे दि. ११ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यात जास्तीत जास्त पात्र मुलींना सुकन्या समृद्धी योजनेत सहभागी करुन घेण्यात येणार आहे.
डाक विभाग नागरिकांना लहान बचत योजना खाते आणि सुकन्या समृद्धी योजनेची जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व डाकघरामध्ये दि. १ ते १० फेब्रुवारी या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत १० वर्षाखालील प्रत्येक मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते उघडून त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हा मुख्य उद्देश आहे. सुकन्या समृद्धी खाते सर्व बचत योजनांमध्ये सर्वाधिक व्याज दर ७.६ टक्के देत आहे. हे खाते किमान २५० रुपयांच्या ठेवीवर उघडले जाऊ शकते. या खात्यात एका आर्थिक वर्षात कमाल रक्कम १ लाख ५ रुपये जमा केली जाऊ शकते. ही रक्कम 80 सी अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र आहे. या खात्याचा लॉक-इन कालावधी खाते काढलेल्या तारखेपासून १५ वर्षे आणि परिपक्वता कालावधी २१ वर्षे आहे. ५० टक्के रक्कम ही मुलीच्या उच्च शिक्षणासाठी काढता येते, तसेच लग्नासाठी खाते बंद करता येते.
या व्यतिरिक्त ग्राहकांनी पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ, टीडी, एनएससी, केव्हीपी योजनांचा सहभाग आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी नजिकच्या पोस्ट ऑफिसमध्ये भेट देऊन दि. १ ते १० फेब्रुवारी 2023 या कालावधीत आपले बचत खाते, मुदत ठेव खाते, तसेच पात्र मुलींच्या नावे सुकन्या समृद्धी खाते काढण्याचे आवाहन डाक अधिक्षक राकेश येल्लामेल्ली यांनी केले आहे.