
जप्त केलेल्या अंमली पदार्थांना ‘अंतीम’ न्याय : बुलढाण्यात ८०० किलो गांजाची कायदेशीर विल्हेवाट
MH 28 News Live / बुलढाणा : जिल्ह्यातील पोलिसांनी केलेल्या विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या तब्बल ८०० किलो गांजाची कायदेशीर विल्हेवाट लावण्यात आली आहे. ‘जप्त केलेले अंमली पदार्थ कुठे ठेवले जातात आणि त्यांचे पुढे काय होते?’ असा अनेकांना पडणारा प्रश्न यानिमित्ताने प्रत्यक्ष उत्तरासह स्पष्ट झाला आहे.
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एनडीपीएस कायद्यानुसार नोंदवलेल्या ११ गुन्ह्यांमधून हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. एकूण ८०० किलो ६४६ ग्रॅम गांजा केंद्रीय गोदामात संकलित करून ठेवण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या ‘मिशन परिवर्तन’ मोहिमेअंतर्गत हा संपूर्ण साठा कायदेशीर प्रक्रियेनुसार नष्ट करण्यात आला.

ही सर्व कारवाई २६ जून ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत करण्यात आलेल्या पोलिसांच्या सततच्या प्रयत्नांमुळे शक्य झाली. पोलिस महासंचालक आणि अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, मुंबई यांच्या सूचनेनुसार ही विल्हेवाट कायदेशीर निकष आणि नियमांनुसार पार पडली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अधिकृत केलेल्या बुटीबोरी (जि. नागपूर) येथील ड्रग्ज डिस्पोजल युनिटमध्ये जप्त गांजाचे नाश करण्यात आले.

या वेळी जिल्हास्तरीय ड्रग्ज डिस्पोजल समितीचे सदस्य आणि अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, पोलीस उपअधीक्षक (गृह) बाळकृष्ण पावरा, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनिल अंबूलकर आदी अधिकारी उपस्थित होते. जिल्हा पोलिसांनी राबवलेली ही कारवाई अंमली पदार्थांविरुद्धच्या लढ्याला नवा बळ देणारी ठरली आहे.



