
विशेष बातमी – बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्त केलेली पातुर्डा येथील ती विहीर आजही देत आहे समतेचा संदेश
MH 28 News Live, संग्रामपूर : सामाजिक भेदभाव आणि अस्पृश्यता मिटवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील एक महान विभूती होते. त्यांनी केलेल्या अनेक ऐतिहासिक आंदोलनांपैकी एक असलेले महाडच्या चवदार तळ्याचे आंदोलन. २० मार्च १९२७ रोजी झालेल्या या आंदोलनाचा आज स्मृतीदिन. अशीच एक घटना बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामधल्या पातुर्डा येथे घडली. बाबासाहेबांनी महाडच्या चवदार तळ्या प्रमाणेच पातुर्डा येथील विहीर सुद्धा दलित बांधवांसाठी खुली करून दिली त्याबद्दलची ही विशेष बातमी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात २० मार्च १९२७ रोजी शेकडो अस्पृश्यांनी महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन तळ्याचे पाणी प्राशन केले व तत्कालीन प्रतिगामी, विषम, अन्यायी व्यवस्थेला आव्हान दिले. अस् पृश्यांना सार्वजनिक पाणवठे खुले करून देण्याचा तो क्रांतिकारी कालखंड होता. हा सत्याग्रह केवळ पाण्याचा नसून, अस्पृश्य देखील माणसे आहेत, हे सिद्ध करण्याकरिता व समतेची मुहूर्तमेढ रोवून त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करण्याची तयारी बाबासाहेबांनी सुरू केली होती. याच पार्श्वभूमीवर बाबासाहेब बुलडाणा जिल्ह्याच्या भेटीवर आले होते. २९ मे १९२९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथे आले. या भेटीत त्यांनी पातुर्डा येथील विहीर दलितांना खुली करून दिली. पातुर्डा येथील बाजारात एका ठिकाणी आजही ती विहीर दिसून येते. डॉ. बाबासाहेबांनी स्वतः या विहिरीचे पाणी काढून अस्पृश्याना दिले होते. पातुर्डा येथे आले असताना येथील जि. प. मुलांची शाळा येथे त्यांचा मुक्काम होता. यावेळी त्यांच्याकरीता अंघोळीसाठी एक पाण्याचा हौद बांधण्यात आला होता. तो आता तेथे अस्तित्वात नाही.
अशी झाली पातुर्ड्याची अस्पृश्य परिषद
२५ मे १९२९ रोजी दोन दिवसीय परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब पातुर्डा येथे आले होते. अस्पृश्यांवर होत असलेल्या अन्यायामुळे, त्यांचा छळ करणे आणि बहिष्कार टाकणे यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील अस्पृश्य धर्मांतर करण्यास तयार झाले होते. त्या अनुषंगाने आपल्या अस्पृश्य बंधूचे यावर काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी तेंव्हाच्या जळगाव जामोद तालुक्यातील अस्पृश्य पुढाऱ्यांनी ही परिषद बोलावली होती. संध्याकाळी झालेल्या या अधिवेशनाच्या आरंभी बथुरामजी दाभाडे यांची कन्या कवतिकाबाई आणि सखाराम इंगळे यांचा विवाह सुधारलेल्या पद्धतीने व अल्प खर्चात करण्यात आला.
या परिषदेत ९ ठराव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील अस्पृश्य समाजास धर्मांतर करण्यास उत्तेजन, नागपूर का,को मध्ये प्रतिनिधींची मागणी, चिखली येथील जुने चोखामेळा बोर्डिंग हणून पाडण्याचा काही प्रतिष्टीतांनी चालु केलेल्या प्रयत्नाचा निषेध व नवीन निघणाऱ्या बोर्डिंगास मदत न करण्याविषयी विनंती, सरकारी व एडेड हायस्कुल मध्ये बहिष्कृत वर्गाचे सर्रास फी घेण्याविषयी मागणी, कामगार महारास पोलीस अधिकाऱ्याकडून होणार त्रास नाहीसा करण्यासाठी विनंती, मेलेल्या जनावरांचे मास गावात न आणण्याविषयी कायद्याने बंदी करण्यास सरकारला विनंती, अस्पृश्य वर्गाने चालविलेल्या बोर्डिंगास दर विद्यार्थ्यामागे ५ रु. प्रमाणे मदत करण्याविषयी व नागपूरचे बोर्डिंग सर्वस्वी चालविण्याविषयी सरकारला विनंती, टाईम्स या वृत्तपत्रामध्ये अस्पृश्य परिषदेचे नेते, खासदार एल. एस,. भटकर यांच्या निधनाची खोटी बातमी छापल्याने बातमीदाराचा निषेध आणि बथुरामजी दाभाडे यांनी या परिषदेचा खर्च एकट्याने भरल्याबद्दल त्यांचे अभिनंदन असे ठराव एकमताने पास करण्यात आलॆ.
मलकापुरलाही दिली होती भेट
१९२९ च्या पातुर्डा भेटीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुढे २६ मार्च १९३४ ला बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे आल्याची नोंद आहे. मलकापूर येथील अस्पृश्य महिलांच्या परिषदेला त्यांनी संबोधित केले. येथील सार्वजनिक वाचनालयाच्या मैदानावर येथील मडकेबुवा जाधव यांनी महिलांची ही परिषद भरविली होती. या परिषदेनंतर मडकेबुवा जाधव व त्यांच्या सहकार्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीची धुरा खांद्यावर घेऊन ते जिल्हाभर जनजागृती करीत फिरत होते.
उंद्री येथे झाला जिल्ह्यातील पहिला धर्मांतर सोहळा
१४ आक्टोबर १९५६ च्या नागपूर येथील पहिल्या धर्मांंतर सोहळ्यानंतर दुसरा धर्मांंतर सोहळा चंद्रपूर येथे झाला. तर तिसरा ऐतिहासिक धर्मांंतर सोहळा बुलडाणा जिल्ह्यातील उंद्री या गावात घेण्याचा बहुमान मिळाला. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी बॅ. खोब्रागडे यांच्या नेतृत्वात ५0 हजार समाज बांधवांच्या उपस्थितीत हा धर्मांंतर सोहळा पार पडला होता. सारा भारत बौद्धमय करेल हे बाबासाहेबांचे स्वप्न तडीस नेण्यासाठी तत्कालीन त्यांचे सहकारी यांनी विदर्भ, मराठवाडा, खान्देश असा सुवर्णमध्य साधणारे व रेल्वे लाईनला लागून शेगावपासून काही अंतरावरील उंद्री गावाची निवड केली होती. त्यासाठी दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रेशिडियन्ट कमिटी नियुक्ती करण्यात आली होती.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button