
राज्यात पुन्हा हवामान विभागाचा इशारा; १५ आणि १६ ऑक्टोबरला अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट
MH 28 News Live / मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना आधीच अतिवृष्टीने मोठा फटका बसलेला असताना आता हवामान विभागाने आणखी एक इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी येत्या दोन दिवसांत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कोपामुळे हिरावला गेला. नुकतेच राज्य सरकारने पावसाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटी रुपयांचे भरपाई पॅकेज जाहीर केले होते. या पॅकेजमध्ये पिकांचे नुकसान, मालमत्तेची हानी, मातीची धूप, थेट आर्थिक मदत, तसेच घरे, दुकाने व गोठ्यांचे नुकसान भरपाईचा समावेश आहे.

दरम्यान, हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार — १५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

१६ ऑक्टोबरला रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पुणे आणि घाट परिसरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सरी कोसळू शकतात. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे व आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.



