जळगाव जामोदमध्ये अनेक लम्पीग्रस्त मोकाट जनावरांचा वावर, पालिकेचे दुर्लक्ष
MH 28 News Live, जळगाव जामोद : शहरात मोकाट फिरत असलेली लम्पीग्रस्त जनावरे. या जनावरांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा व इतर जनावरांना बाधा होण्याची भीती व्यक्त होत आहे.
मागील काही दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यावर लम्पीग्रस्त मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. यापैकी काही जनावरे ही श्रीमंताची तर काही पदाधिकाऱ्यांची आहेत. लम्पीग्रस्त जनावरांमुळे इतर सुदृढ असलेल्या जनावरांना हा आजार जडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शहर वासीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लम्पीग्रस्त व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, असे पत्र पशुसंवर्धन विभागाने पालिका प्रशासनाला दिले आहे. परंतु पालिकेने या पत्राची साधी दखल घेतली नाही. त्यामुळे शहरात लम्पीग्रस्त जनावरांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
श्रीमंतासह पदाधिकाऱ्यांचीही आहेत मोकाट जनावरे
शहरात मोकाट फिरणारी जनावरे ही काही श्रीमंताची आहेत तर काही राजकीय पदाधिकाऱ्यांची आहेत. ही जनावरे सरांस आठवडी बाजारात फिरत आहेत. या जनावरांपैकी बऱ्याच जनावरांना लम्पीने ग्रासून टाकले आहे. त्यामुळे या जनावरांपासून सुदृढ जनावरे देखील बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
रस्त्यावर, नांदुरा अर्बन बँकेच्या प्रवेश द्वाराच्या बाजूला लम्पीग्रस्त झालेली गाय बसलेली आहे. तिच्या शरीरातील रक्तस्त्राव होत असून त्याचे थिगळ रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना रक्ताची दुर्गंधी येत आहे. दुसऱ्या एका लम्पीग्रस्त गाईंची हिच परिस्थिती आहे.
तालुक्यात पाचशेहून अधिक जनावरांना लॅम्पीची लागण
तालुक्यात पाचशे हुन अधिक जनावरांना लम्पीची लागण झाली असून या आजाराने काही जनावरांचा देखील मृत्यू झाला आहे. मनुष्यबळ कमी असल्यामुळे मोकाट जनावरांना पकडून त्यांचे लसीकरण व उपचार करणे शक्य नाही. त्यासाठी पालिका प्रशासनाने ठोस उपाय योजना कराव्या, असे पत्र पशू संवर्धन विभागाने पालिकेला १९ सप्टेंबर रोजी दिली आहे. परंतु दोन महिने उलटूनही पालिका प्रशासनाकडून कुठलीच कारवाई होत नसल्यामुळे शहरवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.
मागील चार ते पाच दिवसांपासून मुख्य शहरातील बाजारपेठेतील लहान – मोठी जनावरे शहरातील नदीकाठाने फिरताना दिसतात. तर जुन्या बाजारात देखील ही जनावरे मोकाट फिरत आहेत तसेच विविध कॉलनी परिसरात सुध्या फिरत असतात. परंतु पालिका प्रशासनाकडून या मोकाट जनावरांवर कुठलीच कारवाई करण्यात येत नसल्याने शहरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
मोकाट फिरणाऱ्या अनेक जनावरांना मोठमोठ्या जखमा झाल्या आहेत. त्यातुन रक्तस्त्राव होवून दुर्गंधी येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. प्रशासन व अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देवुन या मोकाट तसेच लम्पीग्रस्त जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button