♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बेकायदेशीर एचटीबीटी बियाण्यांची विक्री वाढती; शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन

MH 28 News Live / बुलढाणा : सध्या बाजारपेठेत अनधिकृतपणे एचटीबीटी (HTBT) कपाशीच्या बियाण्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली असून, कृषी विभागाने याबाबत गांभीर्याने दखल घेतली आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी स्पष्ट केले की, “एचटीबीटी कपाशीची लागवड भारतात कायदेशीर मान्य नाही. त्यामुळे अशी बियाणे विक्री करणे व खरेदी करणे हे दोन्ही बेकायदेशीर आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल.”

ढगे यांनी यावेळी शेतकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, “प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांचा वापर केल्यास उत्पादनाच्या बाबतीत गंभीर परिणाम होऊ शकतात. बियाणे खरीदी करताना अधिकृत कंपन्यांचे व कृषी विभागाने मान्यता दिलेलेच बियाणे घ्यावे. अनधिकृत विक्रेत्यांच्या मोहजालात अडकू नये.”

शेतकऱ्यांचे प्रबोधन गरजेचे

बियाणे विक्रीत वाढलेल्या फसवणुकीच्या प्रकारामुळे आता शेतकऱ्यांचे प्रबोधन अत्यंत गरजेचे बनले आहे. अनधिकृत बियाण्यांच्या मोहात येऊन शेतकरी त्यांचा आर्थिक व नैसर्गिक नुकसान करून घेत आहेत. बियाण्यांची विश्वासार्हता, उत्पादनक्षमता, तसेच कीटकनाशकांच्या प्रतिकारशक्तीबाबत चुकीची माहिती दिली जाते आणि शेती संकटात सापडते.

शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात:

केवळ कृषी विभागाच्या परवानगीप्राप्त दुकानांतूनच बियाणे खरेदी करावीत.

पॅकेजिंगवर उत्पादक कंपनीचे नाव, बॅच नंबर, उत्पादन व कालबाह्यता तारीख यांची खातरजमा करावी.

शंका असल्यास जवळच्या कृषी कार्यालयात त्वरित संपर्क साधावा.

कृषी विभाग सजग

कृषी विभागानेही यासंदर्भात कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या असून, बाजारातील बियाण्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. अनधिकृत विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांनी सावध राहावे, कायदेशीर मार्ग स्वीकारावा आणि त्यांच्या मेहनतीचे सोनं होण्यासाठी अधिकृत व सुरक्षित बियाण्यांचाच वापर करावा, असा संदेश कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129