
घाटावर मुसळधार, मलकापूरला प्रतीक्षा; तालुक्यात फक्त २२ टक्केच पेरण्या
MH 28 News Live / मलकापूर : जिल्ह्यातील घाटावरच्या तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांपासून जबरदस्त पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे वाहू लागले असून, शेतजमिनी ओलावल्याने तेथे पेरणीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, घाटाखालील मलकापूर तालुक्यात मात्र पर्जन्यमान समाधानकारक नाही.
मलकापूर तालुक्यात मागील २३ दिवसांत केवळ ७५.८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, त्यामुळे तालुक्यात केवळ २२ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. अत्यल्प पावसामुळे शेतकरी चिंतेत असून, पेरणीसाठी योग्य ओलावा मिळत नसल्याने खरीप हंगामाला फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांत काही प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पेरणीची गती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, पुरेसा व सातत्यपूर्ण पाऊस न झाल्यास पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
घाटावर आणि घाटाखालच्या भागातील या पर्जन्यमानातील तफावतामुळे मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. परिसरातील शेतकरी आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असून, पावसावरच त्यांच्या जीविका आणि खरीप हंगामाचे भवितव्य अवलंबून आहे.