♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मतदार नोंदणीसाठी बुलढाणा जिल्ह्यात विशेष शिबिरे; १९, २०, २६ व २७ सप्टेंबरला सर्व मतदान केंद्रांवर BLO राहणार उपस्थित; नवमतदार, महिला व दिव्यांगांच्या नोंदणीला प्राधान्य

MH 28 News Live / बुलढाणा : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सर्व सात विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेऊन मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.

या विशेष शिबिरांचे आयोजन १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर करण्यात येणार आहे. या काळात संबंधित केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मतदारांना आवश्यक मार्गदर्शन करून अर्ज स्वीकारतील. नवमतदारांसाठी विशेष संधी म्हणून शाळा व महाविद्यालयांमध्येही कामकाजाच्या वेळेत विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत. या मोहिमेत महिला तसेच दिव्यांग नागरिकांच्या मतदार नोंदणीला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

फॉर्म क्रमांक ६ हा १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांसह मतदार यादीत अद्याप नाव नसलेल्या पात्र नागरिकांसाठी आहे. फॉर्म क्रमांक ७ द्वारे मतदार यादीतील एखाद्या नावाबाबत हरकत नोंदविता येणार असून, पात्रतेनुसार नाव वगळण्याची मागणीही करता येईल. फॉर्म क्रमांक ८ रहिवास स्थलांतरित झाल्यास किंवा मतदार नोंदीमध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी वापरता येणार आहे.

नागरिकांना अर्ज सादर करण्यासाठी ऑफलाइनसोबतच ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित BLO, ERO किंवा AERO यांच्याकडे प्रत्यक्ष अर्ज सादर करता येतील. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत voters.eci.gov.in, Voter Helpline App आणि NVSP Portalच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. प्रारूप मतदार यादी तसेच ASDD मतदार यादी पाहण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून QR कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची पडताळणी करून आवश्यक असल्यास नोंदणी, दुरुस्ती किंवा हरकत प्रक्रिया पूर्ण करावी आणि लोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129