
मतदारांसाठी मोठी बातमी… नोटिसीला उत्तर देण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही; कागदपत्रे ऑनलाईन किंवा BLO कडे सादर करा !
MH 28 News Live / बुलढाणा : भारत निवडणूक आयोगाच्या नवीन सुधारित सूचनांनुसार, ज्या मतदारांची माहिती जुळलेली नाही (No Mapping) किंवा ज्यांच्या माहितीत तार्किक विसंगती (Logical Discrepancy) आढळली आहे, त्यांना आता सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची कोणतीही गरज नाही. निवडणूक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे की, अशा मतदारांनी फक्त आपली आवश्यक कागदपत्रे जमा करावीत. यामुळे सर्वसामान्य मतदारांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांची प्रत्यक्ष धावपळ वाचणार आहे.
नोटीस मिळालेल्या मतदारांच्या घरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) स्वत: भेट देऊन आवश्यक ती कागदपत्रे गोळा करतील. इतकेच नाही, तर मतदारांच्या सोयीसाठी व्हॉट्सॲपची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदार आपली कागदपत्रे किंवा पुरावे व्हॉट्सॲपवरून संबंधित बीएलओकडे सहज पाठवू शकतात. कागदपत्रे किंवा बीएलओच्या पडताळणी अहवालाच्या आधारेच पुढील निर्णय घेतला जाईल. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच ऑनलाईन सुनावणी होईल, ज्याला मतदाराच्या घरातील कोणतीही मोठी व्यक्ती उपस्थित राहू शकते.
विशेष शिबिरे आणि ऑनलाईन सुविधा
मतदारांना कागदपत्रे सादर करणे अधिक सोपे जावे यासाठी ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नोटीस मिळालेले नागरिक या शिबिरांमध्ये जाऊन आपली कागदपत्रे जमा करू शकतात. तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या मदतीने मतदारांशी संपर्क साधण्याचे निर्देश बीएलओना देण्यात आले आहेत. पुरेसे पुरावे नसल्यास मतदाराला त्याची बाजू मांडण्यासाठी योग्य ती संधी दिली जाईल.
वंचित घटकांसाठी मदत कक्ष
बेघर, कामगार, गरीब, आदिवासी, अनाथ आणि विशेषतः PVTG गटातील नागरिकांसारख्या असुरक्षित घटकांसाठी विशेष शिबिरे आणि मदत कक्ष सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणताही पात्र मतदार मतदारयादीतून वगळला जाऊ नये, यासाठी सर्व नोंदणी अधिकाऱ्यांना विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.
प्रशासनाचे मतदारांना सहकार्याचे आवाहन
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सुलभता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नोटीस मिळालेल्या सर्व मतदारांनी कोणतीही भीती किंवा गोंधळ न बाळगता, घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) आवश्यक कागदपत्रे देऊन पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.



