♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

९० फूट खोल विहिरीत मृत्यूशी झुंज; ग्रामस्थांच्या मदतीने काळविटाला जीवदान ! संग्रामपुरात वनविभागाची धाडसी मोहीम; सुटका होताच काळवीटाने घेतली नैसर्गिक अधिवासाकडे धाव

 

MH 28 News Live / संग्रामपूर : खोल विहीर, पाण्याचा अथांग साठा आणि मृत्यूशी सुरू असलेली झुंज… अशा संकटात सापडलेल्या काळविटासाठी वनविभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थ देवदूत ठरले. खांडवी शिवारातील तब्बल ९० फूट खोल विहिरीत पडलेल्या काळविटाला वनविभागाच्या पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले. शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या या थरारक बचावकार्याचा शेवट काळविटाच्या नैसर्गिक अधिवासाकडे झालेल्या वेगवान धावण्याने झाला.

शेतमालक श्रीकृष्ण कवरे हे शेतातील पिकांना पाणी देत असताना विहिरीत काळवीट पडल्याचे निदर्शनास आले. विहीर खोल आणि पाण्याने भरलेली असल्याने काळविटाचा जीव धोक्यात होता. माहिती मिळताच वनविभागाचे वनपाल व्ही. बी. पाथ्रीकर, वनरक्षक एस. ए. निकाळजे, वनमजूर आणि निसर्गप्रेमी छायाचित्रकार प्रशांत सोनोने यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दोरखंडाच्या मदतीने सुटका

काळविटाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी वनकर्मचाऱ्यांनी नियोजन केले. जाड दोरखंडाचा फास तयार करण्यात आला. विहिरीच्या रचनेची माहिती असलेले श्रीकृष्ण कवरे स्वतः विहिरीत उतरले. पाण्यात जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या काळविटाला पहिल्याच प्रयत्नात फासात अडकवण्यात यश आले. त्यानंतर दोरखंडाच्या सहाय्याने काळविटाला सावधपणे विहिरीबाहेर काढण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत त्याच्या शरीराला अधिक दुखापत होऊ नये, याची विशेष काळजी घेण्यात आली.

अर्ध्या तासानंतर पुन्हा भरारी

विहिरीत पडताना काळविटाच्या मागील मांडीला जखम झाल्याचे आढळले. बाहेर काढल्यानंतर ते काही काळ निश्चल पडून राहिले. घाबरल्यामुळे आणि शारीरिक ताणामुळे अशी अवस्था होऊ शकते, असे वनपालांनी सांगितले. त्यामुळे काळविटाला त्रास न देता सर्वांनी काही अंतरावरून निरीक्षण सुरू ठेवले. काही वेळाने काळविटाने स्वतःची जखम चाटण्याचा नैसर्गिक प्रयत्न केला आणि त्यानंतर अचानक वेगाने धावत आपल्या नैसर्गिक अधिवासाकडे कूच केले.

या बचावकार्यात वनपाल व्ही. बी. पाथ्रीकर, वनरक्षक एस. ए. निकाळजे, वनमजूर बी. झेड. जामुनकर, महेंद्र तायडे, नरेश खालपे, जवाहरलाल जामुनकर, श्रीकृष्ण कवरे, ओम कवरे, आदित्य कवरे, चेतन बगे आणि निसर्गप्रेमी छायाचित्रकार प्रशांत सोनोने यांनी सहभाग घेतला. वनविभागाचे नियोजन, ग्रामस्थांची तत्परता आणि वन्यजीवांप्रती असलेली संवेदनशीलता यामुळे एका निष्पाप वन्यजीवाला नवजीवन मिळाले. शासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थ एकदिलाने कामाला लागले, तर संकटात सापडलेल्या जीवासाठीही आशेचा किरण निर्माण होऊ शकतो, याची प्रचिती या घटनेने दिली.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129