
शेतकऱ्यांच्या मदतीत ‘ई-केवायसी’चा अडथळा; सेतू केंद्रांत गरजूंची होत आहे पिळवणूक
MH 28 News Live / देऊळगाव राजा : मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्यास सुरुवात झाली असली, तरी ती प्रत्यक्षात खात्यावर जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना आधार संलग्न ई-केवायसी करून खात्याचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक ठरविण्यात आले आहे. यामुळे सेतू केंद्रे व आपले सरकार सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे.
तथापि, काही केंद्र चालकांकडून या सेवेसाठी ३० ते ५० रुपये इतके अनधिकृत शुल्क आकारले जात असल्याचे समोर आले आहे. ओळखीच्या व्यक्तींना कमी दर, तर इतरांना अधिक शुल्क घेऊन वेगळा न्याय केल्याची माहितीही उघडकीस आली आहे. यामुळे मदत मिळण्याआधीच शेतकरी शोषणाचा बळी ठरत असल्याची चर्चा आहे.

मेहकर तालुक्यातील तब्बल ६८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे ६५ हजार हेक्टर शेती क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते. यानंतर ६ ऑगस्ट रोजी शासनाने मदत जाहीर केली होती; मात्र ई-केवायसीशिवाय ही मदत खात्यात जमा होऊ शकत नाही.
या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांकडून शासनाने तातडीने लक्ष घालून सेतू केंद्रांवरील वसुली थांबवावी आणि शेतकऱ्यांना ही प्रक्रिया मोफत, पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.



