
अमडापुरच्या वायरमनचा प्रताप, बायकोला संताप, महावितरणच्या डोक्याला ताप
MH 28 News Live, अमडापुर : ३४ वर्षीय विवाहितेने सासरच्यांकडून होणाऱ्या छळाविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. तिचा पती महावितरण कंपनीत लोणारमध्ये वायरमन म्हणून कार्यरत आहे. त्याची ड्युटी साखरखेर्ड्याजवळील एका गावात लावलेली आहे. तो दारू पिऊन नोकरीवर जाण्यास टाळाटाळ करतो. त्यामुळे घराचे हप्ते थकले आहेत. बँकवाल्यांनी घरजप्तीची कार्यवाही सुरू केली आहे… दुसरीकडे महावितरणनेही पतीला ड्युटी करत नसल्याने नोटीस बजावली आहे. दुसरीकडे विवाहितेला १० लाख रुपये माहेरावरून आणण्यासाठी त्याने छळ सुरू केला आहे. यात त्याला सासू, दिर, नणंदही साथ देत असल्याचा आरोप विवाहितेने तक्रारीत केला आहे. त्यामुळे पोलिसांनी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चिखलीच्या दांडगे ले आऊटमधील काझीनगरात विवाहिता राहते. ३१ एप्रिल २००५ रोजी तिचे लग्न झाले होते. तिला एक १४ व दुसरा ११ वर्षांचा मुलगा आहे. तिला अमडापूरला दिले आहे. लग्नानंतर ती नांदायला अमडापूरला गेली. सुरुवातीची काही वर्षे तिला चांगली वागणूक मिळाली. चिखली येथे तिला भाड्यात खोलीत ठेवण्यात आले. मुलांच्या शिक्षणाची सोय होईल म्हणून तीही तयार झाली. तिचा पती साखरखेर्डाजवळील एका गावात ड्युटी करायचा. त्याने एचडीएफसी बँकेतून लोन घेऊन घर बांधले. त्यानंतर काही महिन्यांपासून तिचा पती दारूच्या आहारी गेला.
व्यसनाधीन होऊन ड्युटीवर जाण्यास टाळाटाळ करू लागला. अमडापूरला जाऊन राहू लागला. पंधरा पंधरा दिवस चिखलीला येत नव्हता. बँकेचे हप्ते वेळेत न भरल्याने बँकेनेही घराला कुलूप लावण्याचा इशारा दिला आहे. सासरच्यांनी विवाहितेला तुझ्या आई-वडिलांकडून पैसे आण व कर्जाची परतफेड कर, असे सांगितले. आता तर पती २० फेब्रुवारी २०२२ पासून भांडण करून अमडापूरला निघून गेला आहे. विवाहितेने लाेणार येथील महावितरणच्या कार्यालयात चौकशी केली असता त्याला कार्यालयातूनही नोटीस देण्यात आल्याचे तिला कळले. त्यातच विवाहिता सध्या वारंवार आजारी राहत आहे. तिला दोन्ही मुले आणि घराची जबाबदारी सांभाळणे अवघड जात आहे. त्यामुळे तिने अमडापूर पोलीस ठाणे गाठून पती व सासरच्या छळाविरुद्ध तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button