
सिक्स सिग्माच्या सोहळ्यात जाणवला बुलडाणा जिल्ह्याचा दबदबा
MH 28 News Live, चिखली : सिक्स सिग्मा एक्सलन्स अवार्ड अंड लीडरशिप समिट देशाचे पहिले सिडीएस माजी जनरल दिवंगत बिपिनचंद्र रावत यांच्या प्रेरणादायी स्मृतींना समर्पित करण्यात आली होती. चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले होते. या भव्यदिव्य सोहळ्याच्या आयोजनात डॉ. भागवत राजपूत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या कार्याबद्दल डॉ. भागवत राजपूत आणि डॉ. मनीष इंगळे यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एका अर्थाने देशाच्या राजधानीत झालेल्या या कार्यक्रमात बुलडाणा जिल्ह्याचा दबदबा पहायला मिळाला.

बुलडाणा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले व मागील अनेक वर्षांपासून दिल्लीमध्ये वास्तव्यास असलेले डॉ. भागवत राजपूत हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.. शिवाय ते नेहमी सामाजिक कार्यात देखील हिरीरीने सहभागी होतात. डॉ. राजपूत गेल्या सहा – सात वर्षांपासून सिक्स सिग्माशी जोडलेले आहेत. सिक्स सिग्माच्या प्रत्येक उपक्रमात डॉ. राजपूत यांचे निस्वार्थीपणे योगदान असते. या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील डॉ. भागवत राजपूत यांच्या कार्याचे कौतुक केले. याशिवाय केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व खा. प्रतापराव जाधव यांनी देखील डॉ. राजपूत यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. भारतीय लष्कराचे उपप्रमुख यांच्यासह अनेक वरिष्ठ शासकीय अधिकारी व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.
सिक्स सिग्माविषयी थोडक्यात
देशातील साडेचारशे पेक्षा अधिक रुग्णालयांचे व्यवस्थापन करणारी सिक्स सिग्मा ही एकमेव कंपनी आहे. देशाच्या प्रगतीमध्ये सरकारच्या खांद्याला खांदा लावून मदत करते शिवाय कुठल्याही शासकीय, निमशासकीय किंवा खासगी संस्थेच्या आर्थिक मदतीशिवाय सिक्स सिग्मा हे काम करत आहे.



