
ना. रावसाहेब दानवे यांची बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी नियुक्ती. दोन वर्षाआधीच भाजपा लागला तयारीला…
MH 28 News Live, बुलडाणा : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांची येत्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाने बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारी पदावर नियुक्ती केली आहे. पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या संदर्भातले पत्र नुकतेच जारी केले असून लवकरच आपला कार्यभार रावसाहेब दानवे हाती घेणार आहेत अशी माहिती पक्षाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने २०१९ मध्ये देखील वाढत्या बहुमताच्या बळावर आपली सत्ता देशात कायम ठेवली. यापुढे देखील केंद्रात सत्तासूत्रे आपल्या हाती राहावी या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने आतापासूनच प्रयत्न सुरू केली आहेत. वास्तविक लोकसभेची आगामी निवडणूक २०२४ मध्ये होऊ घातली आहे. परंतु तत्पूर्वी दोन वर्ष आधीच पक्षाने ही निवडणूक सर्वशक्तीनिशी लढण्याचा व जिंकण्याचा संकल्प केला असून त्यादृष्टीने तयारी देखील सुरू झाली आहे.
बुलडाणा जिल्ह्याला लागूनच असलेल्या जालना मतदार संघाचे लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करणारे रावसाहेब दानवे यांचे जिल्ह्यातील भाजपासह सर्व पक्षांच्या नेत्यांशी निकटचे संबंध आहेत. अनेकदा ते विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जिल्ह्याला भेट देत असतात. त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदार संघाची खडानखडा माहिती असलेले ना. दानवे यशस्वीरित्या आपल्या पदाला न्याय देतील अशी अपेक्षा भाजपाचे जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते व्यक्त करत असून रावसाहेब दानवे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याचे जिल्ह्यामध्ये उस्फूर्त स्वागत होत आहे.



