हद्दवाढीमुळे रखडले चिखली न. प. प्रभाग पुनर्रचनेचे काम. पालिका आणि जनगणना विभागाने काढलेल्या संभाव्य मतदारवाढीच्या आकड्यामध्ये आली तफावत
MH 28 News Live, चिखली : ओबीसी आरक्षणाचा विषय न्यायालयाच्या कक्षेत असल्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला विलंब होत आहे. तरीदेखील राज्यातील कार्यकाळ संपलेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगर पालिका व नगर पालिकांच्या निवडणुका येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे..या दृष्टीने राज्य निवडणूक आयोग व राज्य सरकारचे प्रशासन देखील कामाला लागले आहे. जिल्ह्यातील 11 पैकी 9 नगरपालिकांच्या निवडणुका या काळात होणार असून या नगरपालिकांमधील प्रभाग पुनर्रचनेचे काम सुरू झाले आहे. मात्र चिखली नगर पालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेचे काम मात्र रखडले आहे. नगरपालिकेच्या हद्दवाढीनंतर वाढलेल्या अंदाजे लोकसंख्येच्या आकड्यावर जिल्हा प्रशासन व नगरपालिकेमध्ये एकमत होत नसल्याने चिखली नगर पालिकेतील प्रभाग पुनर्रचनेच्या कामाला अद्याप सुरुवात झाली नसल्याची माहिती आहे.
बऱ्याच काळापासून राज्य शासनाकडे पाठवलेल्या चिखली नागर नगरपालिकेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावाला शासनाने काही महिन्यांपूर्वी मान्यता दिली. त्यामुळे आता चिखली नगरपालिकेची हद्दवाढ होणार असून यामध्ये आसपासच्या काही ग्रामपंचायतींसह नवीन वस्त्या देखील समाविष्ट करण्यात येणार आहेत. परिणामी चिखली शहराच्या लोकसंख्येमध्ये वाढ होणार असल्याचे उघड आहे. मात्र यासंदर्भात नगरपालिका प्रशासन आणि शासनाच्या जनगणना विभाग या दोन्हींच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेल्या लोकसंख्येच्या संभाव्य वाढीच्या आकड्यांमध्ये तफावत येत आहे. चिखली पालिकेने हद्दवाढीनंतर १३५२ मतांची भर लोकसंख्येत पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला असून शासनाच्या जनगणना विभागाने मात्र हद्दवाढीनंतर १५३२ मते वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. या दोन्ही आकड्यांमध्ये तफावत येत असल्याने चिखली नगर पालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेचे काम खोळंबले असल्याची माहिती नगर पालिकेच्या सूत्रांकडून MH 28 News Live ला प्राप्त झाली आहे. चिखली नगर पालिका आणि जनगणना विभागादरम्यान सध्या यावर चर्चा सुरू असून हा अडथळा पार करून प्रभाग पुनर्रचनेचे काम लवकरात लवकर कधी सुरू होते याकडे चिखलीकरांचे लक्ष लागले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button