♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हुंड्याच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा, पती अटकेत

MH 28 News Live / मेहकर : हुंड्यासाठी होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून मेहकर येथील २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, मुख्य आरोपी असलेल्या पतीला अटक करण्यात आली आहे.

मृत महिलेचे नाव वैष्णवी मेरत असे असून, सासरच्या मंडळींकडून सातत्याने हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या छळाला कंटाळून वैष्णवीने अखेर राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले.

या घटनेतील सर्वाधिक वेदनादायी बाब म्हणजे, वैष्णवीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले तेव्हा तिचा अवघा तीन वर्षांचा मुलगा आयांश घरातच उपस्थित होता. आईच्या निधनामुळे हा निष्पाप चिमुरडा मातृछत्राला मुकला असून, या घटनेने संपूर्ण मेहकर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वडिलांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

घटनेनंतर मृत वैष्णवीचे वडील रतन पागोरे यांनी मेहकर पोलीस ठाण्यात धाव घेत सविस्तर तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि नणंद अशा चौघांविरुद्ध हुंडाबळी व अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविला. पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपी असलेल्या पतीला अटक केली.

पतीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

अटक केलेल्या पतीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मृत विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून हुंडाबळी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129