
पावसाळ्यात साथीचे आजार उद्भवू न देण्यासाठी प्रशासन सज्ज..! आरोग्य विभागाचा कृती आराखडा, विविध उपाययोजनांचे नियोजन
MH 28 News Live, बुलडाणा : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक गावांमध्ये जलजन्य साथरोग उद्भवतात. काही ठिकाणी तर साथरोगाचा मोठा फैलाव होता. परिणामी जिवीतहानीसुद्धा होते. पावसाळ्यात दुषीत पाण्यामुळे साथीचे आजार डोके वर काढतात. त्यामुळे साथीचे आजार उद्भवू नये यासाठी आरोग्य प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. आरोग्य विभागाने विविध उपाययोजनांचे नियोजन केले आहे.
आरोग्य कर्मचारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व घरांना भेटी देऊन रोग सर्वेक्षण करणार आहे. यामध्ये आजाराचा प्रसार, प्रतिबंधात्मक काळजी घेणे, लक्षणे, उपलब्ध घरगुती औषधी व धोक्याची चिन्हे आदीबाबत आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात 7 जोखमीग्रस्त गावे आहेत. यामध्ये उद्भवलेल्या साथीचा विचार करून अशा गावांना जोखमीग्रस्त गाव म्हणून जाहीर केले आहे. या गावावर विशेष लक्ष केंद्रीत केले असून जोखमीग्रस्त गावांची यादी तयार करताना नदीकाठचे गावे, साथ उद्भवलेली गावे यांचा समावेश करण्यात आला आहे. गावपातळीवर पाणी शुद्धीकरण करणाऱ्या ग्रामपंचायतीचे जलसुरक्षक यांना वर्षातून दोन वेळा प्रशिक्षण देण्यात आले आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये उद्भवणाऱ्या विविध आजारांवर उपचारासाठी आवश्यक असणारा औषधीसाठा जिल्हास्तरावर पुरेशा प्रमाणात ठेवण्यात आला आहे. साथीचे आजार उद्भवल्यास नियंत्रणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सदर औषधीसाठा पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे विविध स्तरावर वैद्यकीय पथके सुसज्ज ठेवण्यात आली आहे. तालुकानिहाय पथकामध्ये कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. त्यानुसार बुलडाणा तालुक्यातील पथकात डॉक्टरांसह 12 कर्मचारी, चिखली मधील पथकात 13, दे.राजा तालुक्यातील पथकात 9, सिं.राजा तालुक्यासाठी 11, लोणारमधील पथकात 11, मेहकर तालुक्यातील पथकात 11, खामगांवसाठी 12, शेगांव येथील पथकात 11, संग्रामपूर पथकात 11, जळगांव जामोद तालुक्यातील पथकात 10, नांदुरा तालुक्यातील पथकात 11, मलकापूर तालुक्यासाठी 9 आणि मोताळा तालुक्यातील वैद्यकीय पथकात 11 कर्मचारी असणार आहेत. अशाप्रकारे पावसाळ्यातील साथीचे आजार न उद्भवण्यासाठी आरोग्य प्रशासन सज्ज असून विविध उपाययोजनांचे नियोजन केले आहे.



