
१६१ शेतकऱ्यांना लावलासुमारे साडेतीन कोटींचा चुना, चिखलीत दाखल झाला ‘ त्या ‘ तिघांवर गुन्हा
MH 28 News Live, चिखली : शहरासह लगतच्या ग्रामीण भागातील १६१ शेतकऱ्यांकडून तूर, चना, भूईमुग, सोयाबीन आदी प्रकारचा शेतमाल खरेदी करून त्यांचे पेमेंट न करता शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा चुना लावणाऱ्या संतोष रणमोडे, समाधान मस्के व नीलेश सावळे या तिघा आरोपींच्या विरोधात चिखली पोलिस ठाण्यामध्ये सुनील मोडेकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीच्या आधारे तीनही आरोपींवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आ. श्वेताताई महाले यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी तपास कार्तात लक्ष घालून शेतकऱ्यांना फसवणार्या आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांना भेटून केली आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, आरोपी संतोष बाबुराव राणमोडे वय 45 वर्षे व्यवसाय व्यापार पवित्र ट्रेडिंग कंपनी एमआयडीसी चिखली, समाधान मस्के मु पो गांगलगाव तालुका चिखली व निलेश आत्माराम सावळे मु पो गांगलगाव तालुका चिखली यांनी चिखली परिसरातील शेतकऱ्यांकडून तूर, सोयाबीन, चना, भुईमूग असा शेतमाल खरेदी केला. या मालाची एकूण किंमत ३ कोटी ४१ लाख ४२ हजार ५०४ रुपये एवढी आहे. शेतकऱ्यांनी त्यांना विकलेल्या मालाचे पैसे हे त्यांचे बँक खात्यात आरटीजीएस द्वारे देण्यात येईल असे आश्वासन या तिघांनी शेतमाल खरेदी करताना शेतकऱ्यांना दिले होते. मात्र, तसा कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता त्यांनी नियोजितपणे कट रचून फिर्यादी सह यात नमूद व इतर शेतकऱ्याना पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. दरम्यान अन्य दोन आरोपींसह सुमारे एक महिन्यापासून संतोष रणमोडे हा बेपत्ता झाला असल्याने त्याच्यासह एकूण तीन आरोपींच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.
या प्रकरणातील फिर्यादी सुनील मोडेकर यांनी मुख्य आरोपी संतोष रणमोडे याला दि. 29 व 30 एप्रिल रोजी आपला शेतमाल विकला होता. या शेतमालाचे पैसे 15 मे रोजी तुम्हाला आरटीजीएस द्वारे मिळतील असे आश्वासन रणमोडे याने मोडेकर यांना दिले होते. 15 मे रोजी पैसे न मिळाल्यामुळे मोडेकर यांनी रणमोडेला पैशाची मागणी केली असता त्याने 20 जून या तारखेचा चेक मोडेकर यांना दिला. मात्र तो चेक देखील बाउन्स झाला. दरम्यान सहा जून रोजी संतोष रणमोडे आपल्या अन्य दोन सहकाऱ्यांसह फरार झाला असून त्याचे शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.