मुक्ताईनगरला कॅरीबॅगमध्ये आढळला मृतदेह, मलकापूर शहरात उडाली खळबळ, त्या निवृत्त शिक्षिकेच्या हत्येचे गुढ कायम !
MH 28 News Live, मलकापूर : स्थानिक रहिवासी असलेल्या निवृत्त शिक्षिका श्रीमती प्रभा माधव फाळके यांची अतिशय क्रुरपणे हत्या झाल्याचे उघड झाले आहे. श्रीमती फाळके यांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह जाड प्लास्टीकच्या कॅरीबॅगमध्ये भरून मुक्ताईनगर – बऱ्हाणपूर महामार्गावर संत मुक्ताबाई साखरकारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळ पुलाच्या खालील बाजूस २९ ऑगस्ट रोजी फेकलेल्या अवस्थेत आढळून आला.
याबाबतची माहिती अशी की, न. प. च्या सेवानिवृत्त कर्मचारी श्रीमती प्रभा माधव फाळके (वय ६३) रा. गणपती नगर भाग २ ह्या २७ ऑगस्ट रोजी परिसरातच असलेल्या मंदिरामध्ये पुजेची थैली घेवून दर्शनासाठी गेल्या. जाताना त्या मुलाला व सुनेला सांगून घरून निघून गेल्या होत्या. मात्र, २९ ऑगस्ट रोजी जळगाव खांदेश जिल्ह्यातील मुक्ताईनगर बऱ्हाणपूर महामार्गावर संत मुक्ताबाई साखर कारखान्याच्या पुडे कुंड गावाजवळ असणाऱ्या पुलाच्या खालील बाजूस एका महिलेचा मृतदेह आढळून आला. याबाबत मुक्ताईनगर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याबाबतचे फोटो विविध पोलीस स्टेशनला पाठविण्यात आलो होते.
श्रीमती फाळके घरून निघून गेल्याची तक्रार त्यांचा मुलगा रितेश माधव फाळके हे मलकापूर शहर पो.स्टे. ला देण्यास गेले असता त्याठिकाणी त्यांना सदर फोटो दाखवण्यात आले. तेव्हा त्यांनी मयत महिला माझी आई असल्याचे पोलिसांना सांगितले. यानंतर मुक्ताईनगर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. त्या अनोळखी महिलेचा मुक्ताईनगर येथे प्लास्टीकमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळलेला मृतदेह हा मलकापूर येथील प्रभा फाळके यांचा असल्याचे स्पष्ट झाल्याने मलकापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर मृतदेहाची मुक्ताईनगर पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केल्यानंतर त्याच दिवशी २९ ऑगस्ट रोजी मृतदेहावर पोलिसांकडून मुक्ताईनगर येथेच अंतीम संस्कार करण्यात आले असल्याची माहिती मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे एपीआय शेवाळे यांनी बोलताना सांगितले. याप्रकरणी तपास सुरू असून अद्यापपावेतो कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button