
बाळूमामाचा अवतार म्हणवून भक्तांची फसवणूक करणाऱ्याला अटक
MH 28 News Live : भोंदूगिरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, स्वतःला ‘बाळूमामाचा अवतार’ म्हणून सादर करत भक्तांची फसवणूक करणाऱ्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याला सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे. ‘भोंदू खरात’ प्रकरण अद्याप ताजे असतानाच ही कारवाई झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. भविष्य बदलवून देण्याचे आमिष दाखवत भोसले हा अनेकांना जाळ्यात ओढत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे, त्याच्यावर यापूर्वीही आर्थिक फसवणूक, भोंदूगिरी आणि बलात्कारासारखे गंभीर असे तीन गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ साली एका महिलेला मालिकांमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत भोसलेने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. यानंतर तिची आर्थिक फसवणूकही केल्याचे उघड झाले होते. पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. मात्र, अशा गंभीर आरोपांनंतरही तो पुन्हा सक्रिय होत लोकांना फसवत असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्याच्यावर पुन्हा कारवाई करत बेड्या ठोकल्या आहेत.
या घटनेमुळे अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या नावाखाली चालणाऱ्या फसवणुकीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी अशा स्वयंघोषित गुरूंवर आंधळा विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले असून, संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ तक्रार करण्याचेही सांगितले आहे.



