
संविधानाची तोंड ओळख मुलांना विद्यार्थी दशेतच व्हावी – रेणुकादास मुळे
MH 28 News Live, चिखली : ” संविधानाची तोंड ओळख मुलांना विद्यार्थी दशेतच झाली तर देशात जबाबदार नागरिक वाढून भारताचा भविष्यकाळात अधिक उज्वल होईल ” असे प्रतिसाद समर्थ भारत केंद्राचे प्रवर्तक पत्रकार रेणुकादास मुळे यांनी केले. स्व. राजाभाऊ बोंद्रे न. प. माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमात दि. २६ नोव्हेंबर रोजी ते प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते.
प्राचार्य एस. एस. इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पर्यवेक्षक शिला नकतोडे, तायडे सर मंचावर उपस्थित होते. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधूता या चार मानवी मुल्यांचा समावेश आपल्या राज्य घटनेत ‘ मुलतत्वे ‘ म्हणून करत संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हा आपल्या देशाची मान अवघ्या जगात उंचावली, आता आपल्या आचरणातून ही मान झूकू न देण्याची जबाबदारी आम्हा प्रत्येक भारतीयाची आहे; यासाठी कायद्याचा आदर करण्याचा संस्कार बालवयातच मुलांच्या मनावर बिंबवला जाणे आवश्यक असल्याचे रेणुकादास मुळे विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य इंगळे यांचे देखील यावेळी भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन दयानंद निकाळजे यांनी केले तर आनंद जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.