♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

देशभरातील ‘ त्या ‘ ७३ डॉक्टरांवर सीबीआयचे छापे, देऊळगाव माळी येथील मूळ निवासी व संभाजीनगर येथे व्यवसाय करणार्या डॉक्टरवर कारवाई

MH 28 News Live, बुलढाणा : विदेशात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी एफएमजीई (विदेशी चिकित्सा स्नातक परीक्षा) उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. मात्र, ही परीक्षा उत्तीर्ण न होताच वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या देशातील अनेक डॉक्टर्सवर शुक्रवार आणि शनिवारी (दि.३० व ३१) केंद्रीय तपास यंत्रणा ‘सीबीआय’ने छापे घालून त्यांच्याकडून दस्तावेज, सामग्री जप्त केली आहे. सुत्रांच्या माहिती नुसार, देशभरातील ७३ डॉक्टर्सवर अशी कारवाई करण्यात आली असून, त्यात मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी गावचे मूळ निवासी व सद्या औरंगाबाद येथे अवैधपणे वैद्यकीय व्यवसाय करीत असलेले डॉ. विनायक अभिमन्यू मगर यांच्या दवाखान्यावर देखील छापा घालण्यात येऊन, दस्तावेज व सामग्री जप्त करण्यात आली आहे. या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सीबीआयने महाराष्ट्रासह अनेक राज्यांच्या १४ मेडिकल काउन्सिल्सला देखील चौकशीच्या घेर्‍यात घेतले आहे.

विदेशात मेडिकलचे शिक्षण घेतल्यानंतर भारतात प्रॅक्टीस करण्यासाठी सर्व डॉक्टर्सला एफएमजीई (विदेशी चिकित्सा स्नातक परीक्षा) ही परीक्षा द्यावी लागते. ती उत्तीर्ण होऊनच भारतात वैद्यकीय प्रॅक्टीस करता येते. डॉ. विनायक अभिमन्यू मगर यांनी चीनमधून वैद्यकीय पदवी प्राप्त केली. परंतु, त्यांनी ‘एफएमजीई’ही परीक्षा उत्तीर्ण केली नव्हती. तरीही ते औरंगाबाद येथे वैद्यकीय प्रॅक्टीस करत होते. काल सीबीआयने त्यांचा दवाखाना तसेच गावाकडील घरी छापे मारून त्यांच्याकडून दस्तावेज व वैद्यकीय सामग्री जप्त केली. तसेच त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई प्रस्तावित केली आहे. सलग दोन दिवस सीबीआयने देशभरात छापेमारी केली आहे. देशात आतापर्यंत ९१ ठिकाणी छापे घालण्यात आले असून, अवैध डॉक्टर्सवर कठोर कारवाई सुरू आहे.

मागील दोन वर्षात चीनसह अनेक देशांतून एमबीबीएस व इतर वैद्यकीय शिक्षण घेऊन विद्यार्थी भारतात परत आले. अनेकांनी कोरोना काळात अनेकांचे शिक्षण अर्धवट राहिले होते. या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनी भारतात वेगवेगळ्या राज्यांच्या मेडिकल काउन्सिल्सकडे रजिस्ट्रेशन करत मेडिकल प्रॅक्टीस सुरू केली होती. तथापि, अनिवार्य असलेली एफएमजीई ही परीक्षा उत्तीर्ण केली नव्हती. याबाबत राष्ट्रीय आयुर्विज्ञान परीक्षा बोर्डाच्या अध्यक्षांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. सीबीआयने केलेल्या चौकशीत देशभरातील ७३ डॉक्टरांची नावे उघड झाली होती.

मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील डॉ. विनायक अभिमन्यू मगर यांनी २०१५ मध्ये चीनमधील जीनिंग यूनिवर्सिटीमधून एमबीबीएस उत्तीर्ण केले आहे. परंतु, भारतातील एफएमजीई या परीक्षेत ते अनुत्तीर्ण झाले होते. त्याउपरही त्यांनी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे नोंदणी केली होती. तसेच प्रॅक्टीसही करत होते. सीबीआयने अशाप्रकारे एफएमजीई परीक्षा उत्तीर्ण नसतानाही मेडिकल प्रॅक्टीस करणार्‍यांची यादी तयार केली, त्यात डॉ. मगर यांचा समावेश होता. त्यामुळे सीबीआयने डॉ. मगर यांच्या घर व दवाखान्यावर छापा मारला व दस्तावेज, सामग्री ताब्यात घेत, कायदेशीर कारवाई प्रस्तावित केली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129