♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नदीच्या लोंढ्यात अडकलेल्या चार शेतकऱ्यांचा थरार; गावकऱ्यांच्या साहसामुळे वाचले प्राण

MH 28 News Live / डोणगाव : येथून एक थरारक घटना समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे अचानक वाढलेल्या काच नदीच्या लोंढ्यात अडकलेल्या चार शेतकऱ्यांना गावकऱ्यांनी जीवाची बाजी लावून सुखरूप बाहेर काढले. रामेश्वर ढोले, अनिता ढोले, छायाबाई पायघन आणि नम्रता पायघन अशी या बचावलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या शेतकऱ्यांनी नदीक्षेत्रात होणाऱ्या जोरदार पावसाचा अंदाज घेत आपली शेतातील कामे लवकर आटोपली होती आणि ते ट्रॅक्टरने डोणगाव येथील आपल्या घराकडे निघाले होते. मात्र त्यांच्या गावाचा रस्ता थेट काच नदीपात्रातून जात असल्याने, नदीत अचानक आलेल्या जोरदार पाण्यामुळे ते मधोमध अडकून पडले.

पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगवान झाल्याने ट्रॅक्टरसह सर्व जण त्या ठिकाणी अडकल्याचे लक्षात येताच गावातील नागरिकांनी धाव घेतली. कधी शिड्या, कधी दोरखंड तर कधी मनाचा धीर एकवटून गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत या चौघांनाही बाहेर काढले.

या धाडसी बचावकार्यात गावकऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि एकजुटीमुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना जिल्ह्यात सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. प्रशासनाकडूनही स्थानिक नागरिकांच्या या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129