
रोहयोमध्ये मजुरांची मजुरी अदा करण्यात जिल्हा अव्वल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव
MH 28 News Live, बुलढाणा : बुलडाणा, 8 मार्च (हिं.स.) महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची मजुरी त्यांच्या बँक खात्यामध्ये आठ दिवसाच्या आत जमा करण्याच्या बाबतीत जिल्ह्याने राज्यात पहिले स्थान पटकाविले. त्यानिमित्ताने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये झालेल्या विशेष समारंभात जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांचा राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत कामाची मागणी करणाऱ्या गावातील मजुरांना गावात काम उपलब्ध करून देणे आणि त्या माध्यमातून गावामध्ये शाश्वत विकासाची कामे निर्माण करणे, तसेच पात्र लाभार्थ्यांना निकषानुसार वैयक्तिक कामे उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे यासाठी ही योजना राबवली जाते.
मागील चार वर्षांपासून जिल्ह्याने या योजनेंतर्गत मजुरी करणाऱ्या मजुरांची मजुरीची रक्कम आठ दिवसांच्या मुदतीत त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याच्या बाबतीत कमालीचे सातत्य आणि तत्परता दाखवली आहे, त्याबद्दल हा सन्मान मिळवून जिल्ह्याने महाराष्ट्रात लौकिक मिळविला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोहोड, उपजिल्हाधिकारी रोहयो अनिल माचेवाड, चिखली, खामगाव, संग्रामपूर येथील गटविकास अधिकारी, तसेच एमआयएस समन्वयक सचिन श्रीवास्तव यांचा सन्मान करण्यात आला.