♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

समृद्धी महामार्गावरील दरोड्याचा उलगडा; राजस्थानातून सोन्याचे दरोडेखोर गजाआड

MH 28 News Live / डोणगाव : समृद्धी महामार्गावरील मेहकरजवळ मुंबईच्या सोन्याच्या व्यापाऱ्याला लुटून फरार झालेल्या टोळीतील पाच दरोडेखोरांना पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे. सलग दहा दिवस चाललेल्या शोधमोहिमेत मेहकर पोलिसांची तीन व बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेची दोन अशी पाच पथके गुंतली होती. अखेर या पथकांना यश मिळाले असून लुटलेले अर्ध्याधिक सोनेही पोलिसांनी जप्त केले आहे.

या टोळीत सहभागी असलेल्या आरोपींपैकी तीन जण खासगी वाहनचालक तर दोघे सराफांच्या दुकानात काम करणारे असल्याचे समजते. अटक झालेल्यांमध्ये विजयसिंग रामसिंग साखला (२६), शिवसिंह लालसिंह झाला (२६), शैतानसिंह भैरवसिंह कितावत (२५), रतनसिंह अमरसिंह सारंगदेव आणि शंकरसिंह जोधसिंह डुलावत यांचा समावेश आहे.

२२ ऑगस्टच्या सायंकाळी साडेसातच्या सुमारास फर्दापूर टोल नाक्याजवळ व्यापारी अनिल चौधरी यांच्यावर हल्ला करण्यात आला. दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाकूने वार करून आणि मिरची पूड टाकून कारमधील तब्बल पाच किलो सोने लुटले होते. त्यानंतर आरोपी वेगवेगळ्या दिशांना पसार झाले होते. सुरुवातीला अकोला येथे एका आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राजस्थानमध्ये धडक कारवाई करून उर्वरित आरोपींना गाठले.

दरम्यान, व्यापाऱ्याचा चालक गमेर सिंग हा दरोड्याचा सूत्रधार असून तो अजूनही फरार आहे. व्यापाऱ्याच्या हालचालींची माहिती त्यानेच टोळीला पुरवली होती. त्याच्यासह इतर काही आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक पुन्हा राजस्थानला रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आणखी काही दरोडेखोर सामील असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129