
अवकाळी पाऊस आणि गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत मदत द्या – आ. श्वेताताई महाले यांची मागणी
MH 28 News Live : चिखली : ऐन उन्हाळ्यात देखील चिखली तालुक्यात दि. २६ एप्रिल रोजी अनेक गावांमध्ये सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमध्ये पीकांचे मोठे नुकसान झाले. या संकटकाळी सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा आणि झालेल्या नुकसानीची त्वरीत भरपाई देण्यात यावी अशी मागणी आ. श्वेताताई महाले यांनी राज्य शासनाकडे केली असून पीकांच्या नुकसानीचा सर्व्हे ताबडतोब सुरू करून शासनाकडे अहवाल सादर करावे असे निर्देश तहसीलदार यांना दिले आहेत.
आसमानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही, रब्बी पीक हातातोंडाशी आले असतानाच निसर्गाचा अकस्मात कोप शेतकऱ्यांवर झाला आणि पीकांचे प्रचंड नुकसान झाले. उदयनगर परिसरातील अनेक गावांसह हातनी शिवारातील गावे आणि गोदरीसह अनेक गावांमध्ये सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अकस्मात आलेल्या अवकाळी पावसाने व सोबतच झालेल्या गारपिटीने तालुक्यातील शेकडो हेक्टर जमिनीवरील पीके बाधित झाली. या आसमानी संकटामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला असून वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे तो आर्थिक अडचणीत आला आहे. अशा बिकट परिस्थितीत पिडीत शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासकीय यंत्रणांनी जलद हालचाली सुरू करून पीकांच्या नुकसानीची पाहाणी करून त्याबद्दलचा अहवाल शासनास त्वरीत सादर करावा असे निर्देश आ. श्वेताताई महाले यांनी तहसीलदार यांना दिले असून राज्य शासनाने संबंधित शेतकऱ्यांना विनाविलंब नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
*शेतकऱ्यांनी खबरदारी घेणे गरजेचे – आ. श्वेताताई महाले*
आज झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमध्ये झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई राज्य सरकारकडून लवकरात लवकर मिळावी यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील आहोत मात्र, हवामान विभागाने दिलेल्या इशार्यानुसार येत्या ३ मेपर्यंत गारपीट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे; ही गोष्ट लक्षात घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व आपल्या पीकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button