
राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला, शेती पिकांना फटका तर बुलढाण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
MH 28 News Live : महिनाभरापासून राज्यातील तापमानात मोठी चढउतार पाहायला मिळत आहे. नागरिकांना कधी पावसाच्या सरी तर कधी कडाक्याच्या उन्हाच्या झळा बसत आहे. एप्रिल महिना संपत आला तरी, अजूनही राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान खात्याने शुक्रवारी (२८ एप्रिल) मराठवाडा, विदर्भात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील बीड, नांदेड, यवतमाळ, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, अमरावती, भंडारा, गोंदिया. अवकाळी पाऊसासह जोरदार गाटपीट होण्याची शक्यता आहे.
पुण्यासह अनेक शहरांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सातारा, सांगली, नाशिक, नगर, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार, चंद्रपूर, वाशीम, लातूर, बुलडाणा, गडचिरोली, धाराशिव, अकोला, वर्धा या १७ जिल्ह्यांमध्येही पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शहरातील कोथरूड परिसर, हडपसर, मांजरी परिसरात आज सकाळीच पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळीच अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तसेच ऑफीसला निघालेल्या चाकरमान्यांची धांदल उडली आहे. याशिवाय वाघोली परिसरात देखील जोरदार पाऊस सुरू झाला आहे.
लातूर जिल्ह्यातही रात्रीपासूनच तुफान अवकाळी पाऊस सुरु आहे. मध्यरात्रीपासून सुरु झालेला पाऊस सकाळपर्यंत सुरुच होता. या पावसानं सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तसेच अमरावती जिल्ह्यात वादळी पाऊस वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. तसेच अनेक ठिकाणी जोरदार गारपीट देखील झाली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या पावसामुळं जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील पिकांचे सतत नुकसान होत आहे. पपई, आंबे यासह हळद, भुईमूग, उन्हाळी कांदा, उन्हाळी सोयाबीन, ज्वारी या पिकांचे या अवकळी पावसानं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे