बोगस दिव्यांग शिक्षकांवर सरकार उचलणार कारवाईचा बडगा; शिक्षण मंत्रालयाने मागितला अहवाल
MH 28 News Live, दैऊळगाव राजा : बनावट प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत विविध प्रकारे लाभ घेणाऱ्या तालुक्यातील बोगस दिव्यांग शिक्षकांवर राज्य सरकार कारवाईचा बडगा उगारणार असून, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने बनावट दिव्यांग शिक्षकांचे सविस्तर अहवाल व स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त पुणे यांना दिले आहे. या अनुषंगाने तालुक्यातील अनेक बोगस दिव्यांग शिक्षकांवर कठोर कारवाईचे संकेत मिळत आहेत.
जिल्ह्यात बनावट प्रमाणपत्राच्या आधारे विविध शासकीय लाभ मिळवणाऱ्या दिव्यांग शिक्षकांचा मुद्दा अलीकडील काळात गाजला होता. महाराष्ट्र शासन युवा पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी बनावट दिव्यांग शिक्षकांकडून शासनाची फसवणूक होत असल्याबद्दलची रीतसर तक्रार नोंदविली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने नुकतेच शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालय कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी शिक्षण आयुक्त पुणे यांना एका पत्राद्वारे बुलडाणा जिल्ह्यासह देऊळगाव राजा तालुक्यातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र जोडून शासकीय सेवेत रुजू झाल्याबद्दल तसेच, इच्छेनुसार बदली संदर्भात शासकीय लाभ घेणाऱ्या शिक्षकांबद्दल चंद्रकांत खरात यांच्या तक्रारीनुसार सविस्तर अहवाल आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्राय सह तात्काळ शासनास सादर करण्याचे निर्देश एका पत्राद्वारे दिले आहे.
दरम्यान तालुक्यातील असंख्य शिक्षकांवर प्रशासकीय कारवाईची कुऱ्हाड पडणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वात जास्त देऊळगाव राजा तालुक्यात दिव्यांग शिक्षक असल्याची नोंद शिक्षण विभागाच्या दप्तरी आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button