
घबराट आणि दहशत… बिबट्या आला रे….! चिखली तालुक्यातील शेतकरी धास्तावले
MH 28 News Live / चिखली : तालुक्यातील शेतकरी सध्या भलते धास्तावले असून ग्रामीण भागात विशेषतः शेतशिवारांमध्ये एका बिबट्याने धुमाकूळ घातल्यामुळे गावकऱ्यांमध्ये सुद्धा घबराट आणि दहशत पसरली आहे. शेलगाव जहाँगीर, मुंगसरी, खंडाळा मकरध्वज परिसरात बिबट्याची भीती निर्माण झाली असतानाच कव्हळा, खामखेड. शेतशिवारात बिबट्या दिसून आल्याचे सांगितले जात आहे,
शेतशिवारात रब्बी हंगामातील पिकांना शेतकऱ्यांकडून पाणी देणे सुरू आहे. अशातच बिबट्या दिसल्यामुळे शेलगाव जहाँगीर, मुंगसरी व खंडाळा मकरध्वज या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या पाठोपाठ कव्हळा व खामखेड शेतशिवारातही बिबट्या दिसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली असून, शेतीकामावर परिणाम होत आहे. हे वन्यप्राणी तुरीच्या शेंगा फस्त करत आहेत. तसेच गहू व हरभरा पिकात हैदोस घालत आहेत. त्यामुळे या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची भीती निर्माण झाली आहे. वन विभागाने या वन्यप्राण्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.