नवभारत फर्टीलायझर कंपनीचे कीटकनाशक फवारल्याने शेतकऱ्यांचा हरभरा पीक धोक्यात; पीडित शेतकऱ्याची थेट कृषी मंत्र्यांकडे तक्रार
MH 28 News Live / लोणार : पिकांवर पडणारी रोगराई आणि किडीपासून पीकाचे संरक्षण व्हावे यासाठी शेतकरी किटकनाशककाचा वापर करतात. मात्र काही कंपन्यांची किटकनाशके बोगस निघतात व त्यामुळे शेतकरी वर्ग फसवला जातो. असाच एक प्रकार तालुक्यात उघडकीस आला आहे. नवभारत फर्टिलायझर या कंपनीचे किटकनाशक हरभरा पीकावर फवारल्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे हरभरा पीक धोक्यात आले असून या बाबत पीडित शेतकऱ्याने थेट कृषी मंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
यावर्षी रब्बीची पेरणी झाल्यापासून हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे वातावरण पिकाला पोषक अवस्थेत दिसून येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिकावरील कीटकनाशक फवारणीचा जोर वाढत आहे. वडगाव तेजन येथील संदीप अंबादास तेजनकर वय ३५ वर्ष या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतातील हरभरा पिकावर वातावरणाचा व अळीचा अंदाज घेऊन कीटकनाशक फवारणीचा विचार करीत असताना नवभारत कंपनीचे गावातीलच असलेले एजंट गौतम मोरे यांचेकडून कीटकनाशक फवारणीसाठी औषधे घेतली. २२ डिसेंबर रोजी हरभरा पिकावर त्या औषधीची फवारणी केली. परंतु दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याने शेतात जाऊन हरभरा पिकाची पाहणी केली असताना हरबरा अत्यंत सुकलेल्या अवस्थेत दिसून आले.म्हणून संदीप तेजनकर या शेतकऱ्यांनी नवभारत फर्टीलायझर कंपनीचे एजंट श्री गौतम मोरे यांच्यासोबत संपर्क केला व गौतम मोरे यांनी आपले वरिष्ठ गजभिये याना फोनवरून सदर माहिती सांगितली.त्यानंतर नवभारत फर्टीलायझर कंपनीचे कर्मचारी गजभिये, गौतम मोरे व कृषी सहाय्यक राजीव शिरसाट तसेच कृषी अधीक्षक विष्णू भगवानराव शिरसाट यांनी संदीप तेजनकर यांच्या शेतामध्ये जाऊन हरभऱ्याची पाहणी केली. तेव्हा हा प्रकार आमच्या कंपनीच्या औषधीने झालेला नाही अशा प्रकारची उडवाउडुची उत्तरे नवभारत फर्टीलायझर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिली.
त्यामुळे नाईलाज झालेल्या संदीप तेजनकर यांनी सदर प्रकार हा लेखी स्वरूपामध्ये अर्ज करून तालुका कृषी अधिकारी लोणार यांना दि. २७ डिसेंबर रोजी कळवला व त्या अर्जाची प्रतिलिपी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार लोणार, तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती लोणार या सर्वांना देऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी व नवभारत फर्टीलायझर कंपनीचे कीटकनाशकाचा नमुना रासायनिक तपासणीसाठी पाठवावा अशी विनंती केली आहे. यावर आता तालुका कृषी अधिकारी लोणार हे काय निर्णय घेतात याकडे वडगाव तेजन सह परिसरातील संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची मी स्वतः पाहणी केली आहे. याबाबत योग्य तो निर्णय आमची कंपनी घेणार आहे.
– रविराज शिदोरे
तालुका कृषी अधिकारी लोणार
शेतकऱ्याच्या खराब झालेल्या हरभऱ्यावर आम्ही अजून औषधी मारून हरभरा पूर्णपणे सुधारणाकरून चांगल्या प्रकारे माल लागेल याचा प्रयत्न करणार व तसे न झाल्यास परिस्थिती पाहून कंपनीतर्फे भरपाई देणार. शेतकऱ्याला तक्रार न देण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला आहे परंतु शेतकऱ्यांनी तक्रार दिल्यामुळे कंपनीतर्फे वकील केस लढेल.
– देवेंद्र गजभीये
नवभारत फर्टीलायझर अधिकारी
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button