सासुरवाडीला गेला आणि जीव गमावून बसला… बुलढाण्यातील तरुणाचा पालघरमध्ये खून
MH 28 News Live / बुलढाणा : पालघर येथे सासुरवाडीला गेलेल्या महादेव दौलत घुगे (३०, रा. बुलढाणा) या विवाहित तरुणावर बोईसर येथील दोन तरुणांनी हुतात्मा चौक परिसरात चाकूचे वार करून हत्या केल्याची घटना १ जानेवारी रोजी रात्री घडली. सिल्वासा येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा गुरुवारी (दि. २) मृत्यू झाला. या प्रकरणी पालघर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील महादेव घुगे याचा दोन महिन्यांपूर्वी पालघरमधील खानपाडा परिसरातील एका तरुणीशी विवाह झाला होता. विवाहानंतर पत्नीची तब्येत बरी नसल्याने ती माहेरी पालघर येथे आली होती. तिला नेण्यासाठी महादेव पालघरला आला होता. बुधवारी रात्री तो एका गुत्त्यावर दारू पिण्यासाठी बसल्यानंतर त्याची बोईसर येथे राहणाऱ्या साहिल राजू वाघारी (२३) याच्याशी ओळख झाली. त्यानंतर हे दोघेही फिरत हुतात्मा स्तंभ परिसरात आले. आरोपी साहिलला त्याचा मित्र अनिस इद्रिस खान (२५) भेटला. तेव्हा तिघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी महादेववर चाकूने वार करून पळून गेले. जखमी अवस्थेत महादेव यांनी पालघर पोलिस ठाणे गाठून पोलिसांना घडलेली हकिकत सांगितली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जवळच असलेल्या साहिल वाघारी याला ताब्यात घेतले; मात्र दुसरा आरोपी अनिस खान हा पळून गेला होता. त्याला बोईसरच्या गदापाडा परिसरातून अटक करण्यात आली.
गंभीर जखमी असलेल्या महादेव घुगे याला प्रथम उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला अत्यवस्थ अवस्थेत पुढील उपचारासाठी सिल्वासा येथील रुग्णालयात नेण्यात आले; मात्र, गुरुवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात प्रथम जिवे मारण्याचा प्रयत्न या गुन्ह्याची नोंद केल्याचे पालघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनंत पराड यांनी सांगितले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button