
सिनेस्टाईल पाठलाग, पिस्तूलच्या धाकावर दीड लाख लुटले,
MH 28 News Live / साखरखेर्डा : मध्यरात्रीच्या सुमारास मोटारसायकलचा सुसाट वेगाने पाठलाग करून कंपनीच्या कर्मचाऱ्यांस पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून सुमारे दीड लाख रुपयांची रक्कम लांबविली. मात्र पोलीस चोरट्यांपेक्षा चाणाक्ष निघाले आणि त्यांनी या दरोडेखोरांना जेरबंद केले.
मोटारसायलचा पाठलाग करुन पिस्तूलचा धाक दाखवत १ लाख ४१ हजार रुपयांची लूट करुन पोबारा करणाऱ्या दरोडेखोरांचा जिल्हा पोलिसांनी जलद गतीने तपास चक्र फिरवून त्यांच्या मुसक्या आवळल्या. बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखा व साखरखेर्डा पोलिसांच्या पथकाने त्याना बेड्या ठोकल्या.
मूळ खामगाव येथील रहिवासी आणि सद्या मेहकर येथे वास्तव्यास असलेले पवन नारायण हागे हे स्वतंत्र मायक्रो फायनन्स कंपनीमध्ये कर्ज वसुली कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. ४ जानेवारीच्या रात्री उशिरा पवन हागे दुचाकीने साखरखेर्डा येथून मेहकरकडे जात होते. दरम्यान त्यांच्या पाळतीवर असलेल्या अज्ञात दरोडेखोरांनी त्यांचा पाठलाग केला. गुंज फाट्यापासून काही अंतरावर हागे यांना रस्त्यामध्ये अडवून त्यांना चाकू व पीस्टलचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या ताब्यातील १ लाख ४१ हजार ८६८ रुपये हिसकावून ते पसार झाले.
या प्रकरणी पवन हागे यांनी साखरखेर्डा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध भारतीय न्यास संहिताचे कलम ३१० (२), ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, साखरखेर्डा ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनात तपास करण्यात आला. गुप्त माहिती तसेच तांत्रिक माहिती काढून अटक करण्यात आली.
अंकित दत्तात्रय जगताप (वय २३), धर्मा उर्फ अभिमन्यू रामभाऊ मंडळकर (वय २३), विलास केशव खरात (वय २८), गणेश दादाराव गवई (वय २५), मंगेश रविंद्र गवई (वय २५) व अविश्कर उर्फ मारी तुषार गवई (वय २२) अशी आरोपीची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून १ लाख २६ हजार रुपये, दुचाकी (किंमत १ लाख रुपये), धारदार चाकू, बनावट पीस्टल, असा एकूण ३ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोलीस अंमलदार शरद गिरी, पुरुषोत्तम अघाव, दिपक वायाळ, चालक पोलीस अंमलदार मुंडे, तांत्रिक विश्लेषक राजू आडवे, ऋषिकेश खंडेराव, साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार धुड, गीते, परीहार, ईनामे, महिला पोलीस अंमलदार गवई, चालक पोलीस अंमलदार वाघ यांच्या संयुक्त पथकाने ही कामगिरी बजावली.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button