
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर दोन टप्प्यात होणार ?
MH 28 News Live : मागील तीन वर्षापेक्षा अधिक काळापासून लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना मुहूर्त कधी मिळणार ? हा प्रश्न ज्याच्या त्याच्या तोंडी आहे. राज्य सरकारकडून याचे उत्तर अद्याप स्पष्टपणे मिळाले नाही. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख जाहीर करा असा आदेश राज्य सरकारला दिला असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन व निवडणूक आयोग यांच्यामध्ये खलबते सुरू असल्याची माहिती आहे. यानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर दोन टप्प्यांमध्ये घेतल्या जातील असे विश्वासनीय सूत्रांकडून कळते.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत बदल घडवून आणण्याकरता न्यायालयीन याचिका सुमारे चार वर्षांपूर्वी दाखल करण्यात आली होती. त्याचा परिणाम म्हणून ह्या निवडणुका लांबणीवर पडल्या. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज हे प्रशासकांच्या व स्थानिक आमदारांच्या हाती एकवटले. स्थानिक पातळीवर असलेले पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व नगरपालिका आणि महानगरपालिकांचे नगरसेवक यांच्या निवडणुका खोळंबल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये खदखद सुरू झाली आणि हळूहळू जनतेमधून देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचा घेण्याची मागणी होऊ लागली.
सर्वोच्च न्यायालयाने देखील काही दिवसांपूर्वी स्पष्ट निर्देश दिल्यामुळे आता राज्य सरकारला याबाबत हालचाली करणे अनिवार्य झाले असून त्या दृष्टीने राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्याच्या घेण्याबद्दल चाचपणी करण्यास राज्य शासनाने सुरुवात केली आहे. यातील पहिले पाऊल म्हणजे राज्य निवडणूक आयोगाशी सदर निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यात आली. आगामी काळ हा पावसाळ्याचा असल्यामुळे या काळात निवडणुका घेणे शक्य नसल्याचे कारण पुढे करून या निवडणुका दिवाळीनंतर घेण्याची भूमिका राज्य सरकार जाहीर करण्याची शक्यता आहे. यामध्ये सुद्धा पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात तर नगरपालिका व महानगरपालिकांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जातील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
ज्या अर्थी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होऊ शकतात त्याअर्थी अद्याप या निवडणुकांना पाच ते सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या काळात राजकीय पक्षांना आपली मोर्चे बांधणी करणे, पक्ष बळकटीसाठी व मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आखणे राबवणे, ही कामे हाती घेतली जातील तसेच प्रशासकीय पातळीवर नवीन मतदारांची नोंदणी, मयत झालेल्या व गाव सोडून गेलेल्या मतदारांची नावे वगळणे आदी प्रक्रिया हाती घेतल्या जातील असे दिसते.