
मुलीला एक फोन कॉल… आणि युवकावर गुदरला जीवघेणा प्रसंग ! शेगावात थरारक घटना
MH28 News Live / शेगाव : शहरात थरारक प्रकार उघडकीस आला आहे. एका युवकाने फक्त फोनवर एका मुलीशी बोलण्याचे धाडस काय केले, त्याच्या जीवावरच बेतले! पाच जणांनी त्या युवकासह त्याच्या मित्राला ठार मारण्याच्या उद्देशाने डांबून ठेवले आणि गळ्याला थेट तलवार लावून धमकी दिली. हा संपूर्ण प्रकार म्हाडा वसाहतीत घडला असून, सुदैवाने प्रसंगावधान राखणाऱ्या युवतीच्या वडिलांमुळे त्यांची सुटका झाली.
राहुल रमेश शिरसागर (वय २२, रा. व्यंकटेश नगर, शेगाव) या युवकाने शेगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, तो एका युवतीशी मागील काही दिवसांपासून फोनवर बोलत होता. एका दिवशी तिच्या इंस्टाग्राम कॉलसंदर्भात गोंधळ झाल्यानंतर ती गोष्ट तिच्या भावाच्या लक्षात आली. त्यानंतर संतप्त भाऊ राहुलचा मित्र कृष्णा पाटेकर याच्या पानटपरीवर पोहोचला आणि दोघांनाही घरी बोलावले.
घरी पोहचताच राहुल आणि कृष्णावर संतप्त कुटुंबीयांनी तुटून पडत मारहाण सुरू केली. दोघांना जबरदस्तीने वरच्या खोलीत डांबण्यात आले. तेथील वातावरण अक्षरशः भयावह होते. तिथे पोहचलेल्या तिघा नातेवाईकांनीही मारहाण आणि शिवीगाळ करत, तलवारीने गळा कापून टाकू अशी धमकी दिली. क्षणाक्षणाला मृत्यूचं सावट त्यांच्या गळ्याला टेकवलेल्या तलवारीतून जाणवत होतं.
सुदैवाने, त्या युवतीच्या वडिलांनी वेळेवर हस्तक्षेप करत ‘दोघांना काही करू नका’ असा आदेश दिला आणि तेव्हा कुठे राहुल व कृष्णाची सुटका झाली. घटनेनंतर राहुल थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आणि सविस्तर तक्रार दाखल केली.
या प्रकरणी शेगाव पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हे नोंदवले आहेत, त्यात खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, जबरदस्तीने डांबणे आणि मारहाण यांचा समावेश आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अमित तळोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
एक फोन कॉल… आणि जीवघेणा प्रसंग !
शेगावात थरारक घटना शहरात घडलेली ही घटना युवक-युवती संवादाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या सामाजिक तापटतेचे भयावह चित्र दाखवते. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणे अत्यावश्यक आहे.