
लग्नाच्या वाटेवर मृत्यूची छाया; अवैध वाळू वाहणाऱ्या टिप्परच्या धडकेत ४२ वर्षीय पुरुषाचा जागीच मृत्यू
MH 28 News Live / देऊळगाव राजा : राज्यात लग्नसराईचा उत्साह शिगेला असतानाच देऊळगाव राजामध्ये एका दुर्दैवी घटनेने आनंदाच्या वातावरणावर शोकाची छाया पसरवली. लग्नासाठी निघालेले राहुल गवई ( वय अंदाजे ४२ ) हे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परच्या धडकेत जागीच ठार झाले.
ही हृदयद्रावक घटना मंगळवार, 21 मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. गवई हे आपल्या नातेवाइकांच्या विवाहसमारंभासाठी देऊळगाव राजा येथे आले होते. समारंभासाठी ठरलेली वेळ जवळ आल्याने ते रस्ता ओलांडत असताना, अचानक एका विना नंबर प्लेटच्या टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की ते जागीच गतप्राण झाले.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
राहुल गवई हे मूळचे साखरखेर्डा येथील रहिवासी होते. ते गावात सकाळी वर्तमानपत्र वाटण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अवैध वाळू वाहतुकीचे थैमान
या अपघातामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अनेकदा स्थानिकांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात आवाज उठवला असूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर, बहुधा नंबर प्लेटशिवाय, बेधडक रस्त्यावरून फिरत असून नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत.
अपघातानंतरचा गोंधळ आणि प्रशासनाची झोप
अपघातानंतर टिप्पर चालक फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, मृतदेह देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला, मात्र मृतदेहाची अवस्था इतकी खराब होती की शवविच्छेदन करणेही कठीण बनले.
न्यायाची मागणी: दोषींवर कारवाई होणार कधी ?
ही घटना केवळ अपघात नव्हे, तर बेकायदेशीर वाळू माफियांच्या सांडलेल्या मनमानीची आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेची साक्ष आहे. आता तरी संबंधित यंत्रणांनी जागे होऊन कठोर पावले उचलावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.